गणेशोत्सवामुळे छोट्या विक्रेत्यांनाही मोठे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:00+5:302021-09-15T04:37:00+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे केवळ दुकानदार आणि मोठे व्यापारीच नाहीत, तर छोट्या विक्रेत्यांनाही चांगले आर्थिक बळ मिळाले आहे. या काळात ...

गणेशोत्सवामुळे छोट्या विक्रेत्यांनाही मोठे बळ
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे केवळ दुकानदार आणि मोठे व्यापारीच नाहीत, तर छोट्या विक्रेत्यांनाही चांगले आर्थिक बळ मिळाले आहे. या काळात मिठाई आणि मोठ्या खरेदीबरोबरच लहान लहान गोष्टींची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
भाज्यांना मागणी
ऋषीपंचमी, गौरीपूजनासाठी विविध भाज्या, वरीचे तांदूळ, तयार मोदक, वडेपीठ, केळीची पाने, हळदीची पाने, काकडी, चिबूड, नारळ यांचाही खप सर्वाधिक असल्याने उलाढाल बऱ्यापैकी होते. पालेभाज्या, फळभाज्यांना मागणी अधिक होती. गणेशोत्सवामुळे जिल्ह्यातील घरे गजबजलेली असल्याने उत्सवकाळात भाज्यांचा खपही बऱ्यापैकी झाला.
पूजा साहित्याचा खप
काही भाविकांकडे दीड दिवसांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने पहिल्याच दिवशी अन्यथा गणेशोत्सवात श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. अन्य भाविक मात्र गणेशोत्सवात सवडीनुसार श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करीत असतात. पूजेच्या साहित्यामध्ये धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी प्राधान्याने केली जाते.
दागिन्यांचीही खरेदी
उत्सवानिमित्त गौरी गणपतीसाठी काही भाविक सोन्या-चांदीचे दागिने, पूजेसाठी ताम्हण, निरांजन, तांब्या, पेला खरेदी करतात. काही भाविक इमिटीशन ज्वेलरी विकत घेत असतात. एकूणच गणेशोत्सवातील विविध वस्तूंच्या खरेदीमुळे बाजारामध्ये कोट्यावधीच्या घरात आर्थिक उलाढाल होते. दरवर्षी संपूर्ण उलाढाल दहा ते बारा कोटीच्या घरात असते. गतवर्षी फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, यावर्षी नेहमीप्रमाणे दहा ते बारा कोटींची उलाढाल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
.........................
गणेशमूर्ती विक्री व्यवसाय रोखीत असतो. कोरोनामुळे गतवर्षी गणेशमूर्तीचे दर बदलण्यात आले नव्हते. मात्र, साहित्य दरवाढीमुळे ग्राहकांचा विचार करून दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आली. इंधन दरात वाढ झाली की, शाडू मातीचे दर, उपलब्धता, रंगकाम, सजावट साहित्याच्या दरातही वाढ होते. यावर्षी तर इंधन दरात सातत्याने वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम साहित्यावर झाला. पर्यायाने मूर्ती दरात वाढ करावी लागली.
- सुशांत गांगण, मूर्तिकार, रत्नागिरी
..................
कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोना असतानाही बाजारात खरेदीसाठी बऱ्यापैकी गर्दी होती. गणेशोत्सवासाठी आणलेला माल संपला आहे. यावर्षी खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दर्शविल्याने व्यवसाय समाधानकारक झाला.
- आदित्य हेळेकर, विक्रेता, रत्नागिरी
..................
कोरोनासारख्या महामारीमुळे गेले दीड वर्ष व्यापारी आर्थिक संकटात होते. गतवर्षी कोरोनाच्या धसक्याने खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होती. परंतु यावर्षी कोरोना निर्बंधांचे पालन करीत खरेदीसाठी ग्राहकांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे गणेशोत्सवात बऱ्यापैकी उलाढाल झाली.
- सूर्यकांत जाधव, व्यावसायिक, रत्नागिरी