‘आशा अभियाना’मुळे बेपत्ता ५२ जणांना दिसले पुन्हा घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:11+5:302021-03-22T04:28:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही ...

‘आशा अभियाना’मुळे बेपत्ता ५२ जणांना दिसले पुन्हा घर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या ‘आशा अभियान’मुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.
अनेकदा शुल्लक कारणावरुन अनेकजण घर सोडतात किंवा काही दुर्दैवी घटनांमुळे काहींना घरापासून लांब जावे लागते. अशा अनेकांची मग फरपट होते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आयुष्यच बदलून जाते. अनेकदा अशा घटना पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता म्हणून नोंदवल्या जातात तर नातेवाईक नशिबावर हवाला ठेवून हरवलेल्या आपल्या माणसांची जन्मभर वाट पाहात राहतात. पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या कार्यालयात ती एक केस म्हणून राहते. परंतु, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मात्र यामध्ये विशेष लक्ष घातले.
रत्नागिरी जिल्ह्यात २००३पासून १४९ महिला तर १८ वर्षांखालील ३९ मुले-मुली हरवली होती. त्यांच्या तपासासाठी डॉ. गर्ग यांनी पुढाकार घेत १ जानेवारीपासून ७ दिवसांसाठी ‘आशा अभियान’ला सुरुवात केली होती. प्रत्येक पोलीस स्थानकातील कर्मचारी निवडून बेपत्ता झालेल्या महिला आणि १८ वर्षांखालील मुले-मुलींना शोधण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. हे अभियान केवळ ७ दिवसांपुरतेच मर्यादित न ठेवता, ते अद्यापपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे. या अभियानामुळे आतापर्यंत तब्बल ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी जाता आले आहे.
चाैकट
डॉ. माेहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २००३पासून बेपत्ता झालेल्या ५२ जणांना घरी परत आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये बेपत्ता झालेल्या १४९ महिलांपैकी ३४ महिला शोधण्यात पोलिसांना यश आले तर बेपत्ता झालेल्या १८ वर्षांखालील ३९ मुलांपैकी १२ मुली आणि ६ मुलांना घरी आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या आशा अभियानामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.