वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:58+5:302021-05-24T04:29:58+5:30
फिव्हर क्लिनिकची मागणी रत्नागिरी : तालुक्यातील पाली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर वेळीच निदान, तपासणी व उपचार ...

वाहनचालक त्रस्त
फिव्हर क्लिनिकची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील पाली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर वेळीच निदान, तपासणी व उपचार होण्यासाठी पाली मराठी शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाली येथे फिव्हर क्लिनिक सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
रायपाटण......... येथे समुपदेशन
राजापूर : तालुक्यातील राखपाटण.............. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या मानसिक समस्या लक्षात घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या ताणतणावाचे नियोजन कसे करावे, सकारात्मकता कशी वाढवावी याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. कृष्णा पेवेकर यांनी समुपदेशन केले.
गीझरचे वाटप
राजापूर : नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला आहे. राजापूर संघातर्फे धारतळे कोरोना केंद्रासाठी पाच गीझर भेट देण्यात आले. यावेळी डाॅ. निखील परांजपे, दीपाली पंडित, ॲड. प्रशांत पाध्ये, ॲड. सुशांत पवार, राजन गाेठणकर आदी उपस्थित होते.
नव्या इमारत कामाला वेग
रत्नागिरी : येथील नगर परिषदेच्या नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला वेग आला आहे. इमारतीचे काम करून घेण्यासाठी विकासक निश्चित करणारी निविदा प्रक्रिया लवकरच होणार आहे. निविदा जाहीर करण्यापूर्वीची इतर प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.
स्वच्छ पाण्याचा पुरवठा
रत्नागिरी : पावसामुळे शहराला गेले चार पाच दिवस गढूळ पाणीपुरवठा होत होता. मात्र शनिवारपासून स्वच्छ पाणी पुरवठा होऊ लागल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी ढवळून निघाल्याने तसेच डोंगरावरील माती मिसळल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.
स्कूल बस चालक न्यायालयात
रत्नागिरी : राज्य सरकारने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे स्कूल बस चालकांचा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी स्कूल बस चालकांच्या स्कूल बस ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
निर्णय प्रलंबित
रत्नागिरी : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क ३० टक्के कमी करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांनी कार्यवाही करावी म्हणून त्यावर निर्णय घेण्याची शिफारस प्रधान सचिवांकडे केली होती. मात्र त्यावर गेल्या आठ महिन्यात काेणतीच कार्यवाही झालेली नाही.
भात बियाण्यांचे वाटप
गुहागर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस यांच्यातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. दहा ते बारा विविध जातीच्या बियाण्यांचे वाटप मंडल कृषी अधिकारी भक्ती यादव, कृषी सहायक दत्तात्रय गिते यांनी करून शेतकऱ्यांना बियाणे वाटपाबाबत मार्गदर्शन केले.
निकाल जाहीर करण्याची मागणी
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक पदभरती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर न केल्याने परीक्षा दिलेल्या उमेदवारांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य सेवक पदाचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.