गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात प्रवेश करताना लवकरच वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासन पंच कमिटीने घेतला आहे. त्यासाठीचा प्रबोधनात्मक वस्त्र संहिता फलक मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.अनेक ठिकाणच्या मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू आहे. आता गणपतीपुळे श्रींच्या मंदिरातही ती लवकरच लागू होणार आहे. बुधवार १३ ऑगस्ट रोजी मंदिर प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावर वस्त्र संहितेबाबत फलक लावला असून यातून तोकडे कपडे, ढोपराच्या वर असलेले, चित्रविचित्र ड्रेस, शॉर्टस, आंघोळीसाठी पाण्यात वापरणारे ड्रेस यासाठी मनाई करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठीही वस्त्र संहिता लागू आहे. यातून दहा वर्षाखालील मुलांना सूट देण्यात येणार आहे.भाविकांनी याची दखल घेऊन त्याचे पालन करूनच दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ही वस्त्र संहिता काही दिवसातच लागू केली जाणार आहे. येथे आलेल्या भक्ताला मंदिराच्या प्रवेशदारातून दर्शन न घेताच परत जावे लागू नये, यासाठी भाविकांनी याबाबत काळजी घ्यावी, यासाठी देवस्थान प्रशासनामार्फत आतापासूनच प्रबोधनात्मक फलक लावले आहेत.
Ratnagiri: गणपतीपुळे श्रींच्या मंदिरात वस्त्र संहिता लागू होणार, मंदिर परिसरात लागले प्रबोधनात्मक फलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:50 IST