अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका; क्षणात बँक खाते हाेऊ शकते साफ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:08+5:302021-08-21T04:36:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. कॉल करण्याच्या बहाण्याने ...

अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका; क्षणात बँक खाते हाेऊ शकते साफ !
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. कॉल करण्याच्या बहाण्याने दुसऱ्याचा मोबाईल घेऊन त्यातून ओटीपी मिळवून फसवणूक करण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीच्या हाती देणे टाळणे गरजेचे आहे.
माेबाईलवर मेसेज पाठवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातच एकमेकांशी ओळख वाढवून काॅल करण्याच्या बहाण्याने माेबाईल घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही; पण या माेबाईलवरून काॅल करता-करता ओटीपी मिळवून बँक खात्यातून पैसे हडप करण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे आता आपला माेबाईलही दुसऱ्याच्या हाती देताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. ओळखीतून माेबाईल दिल्यानंतर बँक खाते जर रिकामे झाले तर मात्र नशिबाला दाेष देण्याशिवाय काेणताच पर्याय उरणार नाही.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन प्रवासात अनेकदा सहप्रवाशांसोबत मोबाईलची देवाणघेवाण होते. फोनमध्ये बॅलन्स नसल्याचे सांगून कॉल करतो म्हणूनही ओटीपी घेतला जाऊ शकतो.
वेगळी लिंक पाठवून
आपल्या क्रमांकावर एखादी लिंक पाठविली जाते. ही लिंक ओपन करायची सूचना येते. त्यानुसार लिंक उघडली तरीसुद्धा खात्यातील पैसे जाऊ शकतात.
लॉटरी लागली असे सांगून
मोबाईल क्रमांकाला लाखो रुपयांचे बक्षीस लागल्याचे मेसेज फोनवर येतात. अशी लॉटरी सहज लागू शकत नाही. लॉटरीचा बनाव करून पैसे उकळले जाऊ शकतात.
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून
भेटवस्तू मिळणार आहे किंवा अमुक ठिकाणी नोकरी लागणार आहे, असे म्हणून केवायसी डॉक्युमेंट घेतले जातात. यामधूनही आर्थिक फसवणूक होऊ शकते.
ही घ्या काळजी
१) आपल्या मोबाईलवर कोणताही ओटीपी क्रमांक बँक किंवा शासकीय अधिकारी मागत नाही. त्यामुळे ओटीपीसाठी काहीही कारण सांगितले तर तो शेअर करू नये. असे केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
२) मोबाईलवर अनोळखी नंबरवरून जर कोणताही बक्षीस लागल्याचा मेसेज आला तर तो ताबडतोब डिलीट करून टाकावा.
काळजी घेणे गरजेचे
ऑनलाईन व्यवहार करताना प्रत्येक काळजी घेणे आवश्यक आहे. फोनवर संपर्क करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व मोबाईल आलेल्या लिंकची खात्री करूनच व्यवहार करावे. लॉटरीच्या मेसेज आले तर त्यांना बळी पडू नये व ते लगेचच डिलीट करावे.
-नितीन पुरळकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल