चिकुनगुनिया, कावीळ यांच्या साथींपासून जिल्हा लांबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:42+5:302021-09-17T04:38:42+5:30
रहिम दलाल लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याची साथरोगांचा प्रादुर्भाव या वर्षभरात झालेला नाही. जिल्ह्यात चिकुनगुनियाचा ...

चिकुनगुनिया, कावीळ यांच्या साथींपासून जिल्हा लांबच
रहिम दलाल
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याची साथरोगांचा प्रादुर्भाव या वर्षभरात झालेला नाही. जिल्ह्यात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. काविळीचे अवघे २ रुग्ण तर डेंग्यूचे १९ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. जिल्ह्यात चिकुनगुनिया, कावीळ आणि डेंग्यूची साथ जिल्ह्यात पसरलेली नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र साथींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. मात्र, रत्नागिरी जिल्हा साथींचा आजारापासून नेहमीच दूर राहिलेला आहे. चिपळूण, खेडमध्ये आलेल्या महापुरानंतर आरोग्य यंत्रणेला रोगराईला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने या भागात दिवसरात्र काम करून कोणतीही साथ पसरणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान, खेड शहरामध्ये गेल्याच आठवड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने ही साथ पसरू दिलेली नाही.
वर्षभरात चिकुनगुनियाचे रुग्ण शून्य
कोरोना विषाणूप्रमाणेच चिकुनगुनियाही एक आजार असून, एका विषाणूपासून याचा संसर्ग होतो. गेल्या काही वर्षांपासून बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पंगतीतच चिकुनगुनिया येऊन बसला आहे. एडीस जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकुनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूंपासून होतो. वर्षभरात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण नाही.
वेळोवेळी जनजागृती
n जिल्ह्यात कावीळ आणि चिकुनगुनियाची वर्षभरात साथच पसरलेली नाही. काविळीचे रुग्णही अत्यल्प आहेत.
n डेंग्यूचे रुग्णही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाहीत. याबाबत आरोग्य विभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येते.
जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्हा रोगराईपासून दूर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादा आजार झाल्यास रुग्णांवर वेळीच उपचार केले जातात. चिकुनगुनियाचा जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेेला नाही.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी
डेंग्यू - अचानक उच्च ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अतिथकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे ही लक्षणे आहेत. अशक्तपणा आणि भूक कमी होऊन ती अनेक आठवडे राहते.
कावीळ - अशक्तपणा, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलट्या होणे, झोप लागणे, डोळेही पिवळे होतात.
चिकुनगुनिया - हाताच्या आणि पायाच्या सांध्यांमध्ये जास्त वेदना आणि सूज येते. ताप येणे. मनगट, कोपरामध्येही समस्या निर्माण होते.