दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे खरीप हंगामात दत्तक खेडे व त्याच्याशेजारील खेड्यांमध्ये भात, नाचणी आणि भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात आले.
यात खरीप हंगामात पीक प्रात्यक्षिकांकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या रत्नागिरी-८, रत्नागिरी-६ नाचणीची दापोली-३ तसेच भाजीपाला बियाणामध्ये कोकण कारली, कोकण घोसाळी, कोकण काकडी, कोकण भेंडी, चिबूड (कोकण मधुर) या बियाणांचे दापोली तालुक्यातील सडवे, साखळोली, वाकवली, मौजे दापोली गुहागर तालुक्यातील कारूळ तसेच खेड तालुक्यातील उधळे आणि कळंबणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी-८ आणि कर्जत-२ हे भात बियाणे व नाचणीचे दापोली-३ हे बियाणे दापोली तालुक्यातील उंबर्ले, इनामपांगारी तसेच खेड तालुक्यातील उधळे या गावातील निवडक शेतकऱ्यांच्या बांधावर सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले.
यावेळी विभागातील वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. प्रवीण झगडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामातील वाटप करण्यात आलेल्या बियाणाची माहिती सांगितली. हा कार्यक्रम विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. विस्तार शिक्षण विभागातील वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. प्रवीण झगडे, कृषी सहायक नरेश आईनकर, कृषी सहायक समीर उसरे, दृकश्राव्यचालक श्रीयश पवार व वाहनचालक आप्पा पोसकर यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोहोचविण्यात आली.