जिल्ह्यातील १९ आरोग्यसेवकांच्या नोकरीवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:13+5:302021-09-02T05:08:13+5:30
चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य ...

जिल्ह्यातील १९ आरोग्यसेवकांच्या नोकरीवर गंडांतर
चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविकांची सेवा संपुष्टात आणली आहे. जिल्ह्यातील १०२ पैकी ८२ पदे मंजूर केल्याने १९ आरोग्यसेविकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. १५ वर्षे योगदान देऊनही या सेविकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ६०० परिचारिकांची सेवा ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविका कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या एका पत्रामुळे ६०० परिचारिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे येथील आरोग्यसेविकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
यावेळी आरोग्यसेविकांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून या आरोग्यसेविका आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहेत. आरोग्य विभागाने केंद्र शासनाला ३२०७ आरोग्यसेविकेची पदे मंजुरीकरिता प्रस्तावित केली होती. त्यांपैकी ५९७ पदांना मंजुरी मिळाली नाही, हे कारण दाखवून ५९७ आरोग्यसेविका यांच्या सेवासमाप्तीचा आदेश दिले आहेत.
ज्या उपकेंद्रांची प्रसूतिसंख्या मागील वर्षभराच्या काळात शून्य आहे. तेथील आरोग्यसेविकेची सेवा समाप्त करावी; परंतु, हा निकष अन्यायकारक आहे. कारण मागील तीन वर्षांपासूनच विभागाने उपकेंद्रावर प्रसूती करू नये, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले. आमदार शेखर निकम यांना निवेदन देताना स्वप्नाली ठसाळे, योगेश कांबळी, माधवी ठसाळे उपस्थित होत्या.
----------------------------
गेली दोन वर्षे कंत्राटी आरोग्यसेविकांना प्रधान सचिवांनी केवळ कोविडचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सन २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यातील कमीत कमी लोकसंख्येची पदे रद्द करण्याचा निकष लावला आहे; परंतु, या लोकसंख्येच्या उपकेंद्रास आरोग्यसेविका भरण्यास मंजुरी विभागानेच दिलेली होती.
-----------------------
गेल्या पंधरा वर्षांपासून शहराचा ग्रामीण भागात अविरतपणे आरोग्य सेवा देत होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना कालावधीत तर त्यांनी रात्रंदिवस काम केले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ऐन उमेदीच्या कालावधीत करायचे काय, त्यांच्या जिवावर कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. मात्र, सेवासमाप्तीच्या आदेशामुळे या सेविका, सेवक पुरते भांबावून गेले आहेत.
- स्वप्नाली ठसाळे, आरोग्यसेविका