तामनळेतील सतरा वर्षांपूर्वीचा वाद मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:38+5:302021-03-31T04:31:38+5:30
देवरूख : येथील पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक मारुती जगताप व त्यांचे सहकारी किशोर जोयशी यांना तामनाळे गावातील ...

तामनळेतील सतरा वर्षांपूर्वीचा वाद मिटला
देवरूख : येथील पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक मारुती जगताप व त्यांचे सहकारी किशोर जोयशी यांना तामनाळे गावातील १७ वर्षांपूर्वीचा वाद मिटविण्यास यश आले आहे. तामनाळे गावातील दोन्ही गटांना एकत्र आणून शिमगोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता एकत्रित शिमगोत्सव होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील तामनाळे येथे सन २००४ साली हुमणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली एका वर्षात रामेश्वर व ग्रामदेवता अशी दोन मंदिरे उभी केली. या मंदिरांचा जीर्णोद्धार सोहळा तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते, माजी आमदार सुभाष बने यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर एकोप्याने काम करणाऱ्या गावाला राजकीय नजर लागली आणि या गावाचे दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून एक गट होळी उत्सवात कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत म्हणून अलिप्त राहिला होता.
गेली १७ वर्षे या दोन गटांना एकत्र करण्यासाठी एका गटामार्फत सुभाष बने, ॲड. सीमा गिडये, बीट हवालदार नाईक, बीट हवालदार शिंदे यांनी प्रयत्न केले होते. कोविड १९ च्या महामारीत पोलीस निरीक्षक मारुती जगताप, त्यांचे सहाय्यक हवालदार किशोर जोयशी व बीट हवालदार जाधव यांनी गाव प्रमुख रघुनाथ गिडये आणि दोन्ही गटातील प्रमुख मानकरी व पोलीस पाटील यांना एकत्र करून चर्चा केली आणि योग्य निर्णय घेऊन शिमगोत्सव एकत्र साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश मानून गावचे पाटील रघुनाथ गिडये व पोलीस पाटील यांनी दोन्ही गटांना एकत्र करून शिमगोत्सव एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार एकत्र सुरुवातही केली. त्यामुळेच दोन्ही गटांचा आनंद द्विगुणित झाला आहे. १७ वर्षांनंतर दोन गट एकत्र करून शिमगोत्सव एकत्र साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक मारुती जगताप व त्यांचे सहकारी किशोर जोयशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.