तंत्रज्ञानाचा हुकूमशहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:13+5:302021-04-10T04:30:13+5:30
वर्षात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट होणार आहे आणि आता ते चित्र पाहायला मिळतं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाले ...

तंत्रज्ञानाचा हुकूमशहा
वर्षात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट होणार आहे आणि आता ते चित्र पाहायला मिळतं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाले तेव्हापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची कामे करत असताना आपण तंत्रज्ञानाचा जोरदार वापर करायला सुरुवात केली आहे. सर्व स्तरावर बैठका होऊ लागल्या. शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. बरेच उद्योगधंदे ऑनलाईन पद्धतीने काम करू लागले. पहिल्या पहिल्यांदा आपण सगळेजण खूप आनंदाने यात सहभागी झालो होतो. पण हळूहळू आपल्या सर्वांच्या लक्षात आलं, की ही ऑनलाईन पद्धत खूपच हानीकारक ठरू लागली आहे . यात वेळेचे भान राहिले नाही. डोळे खराब होऊ लागले. त्यामुळे रात्री शांत झोप येईनाशी झाली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांची तर वाताहत झाली आहे. मुलांच्या काही संकल्पना स्पष्ट न झाल्याने मुलं खूप गोंधळून गेली आहेत. व्हर्च्यूअल संकल्पना मुलांना समजायला मार्ग नाही. शाळेच्या प्रांगणात जे अनुभव येतात, ते अनुभव, ती अनुभूती मोबाईलच्या चतकोर तुकड्यावर कुठली येईल ?
मुलांच्या बौद्धिक विकासापलिकडे एक भावनिक विकास असतो. त्याचा या तंत्रज्ञानाने फज्जा उडविला आहे.
ऑनलाईन कामामुळे आपण सारे भावनिक विचार करायचे विसरूनच गेलो. आपल्या जगण्या वागण्यात एक कोरडेपणा आला आहे. त्यातूनच मुलंही एकलकोंडी होऊ लागली आहेत. बरं हे शिक्षणापुरतंच आहे असं नाही, तर सर्व क्षेत्रांमध्ये याचा दुष्परिणाम झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाने साऱ्या जगाला जवळ केलं. पण, माणसाच्या मनाला मात्र खूप दूर करायला ते कारणीभूत ठरले. एका भविष्यवेत्त्याने भविष्य वर्तविले आहे, की सन २०६५ मध्ये बिन आवाजाचे तिसरं आणि अखेरचं महायुद्ध होणार आहे. ही तर खूप लांबची गोष्ट झाली. पण, त्याआधी येत्या चार ते पाच वर्षात करन्सी महायुद्ध होणार असून, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचे युद्ध होणार आहे. असा आमचा होरा आहे. असो! आणखीन काही दिवसांनी असं होणार आहे, की हा तंत्रज्ञानाचा हुकूमशहा आपल्यावर राज्य गाजवणार आहे. तो तुम्हाला न सांगता तुमच्या मिटिंग अटेंड करायला तुम्हाला भाग पाडेल. इतकेच नाही तर तुम्ह मिटिंग अटेंड केली नाही तर तुमच्यावर हा तंत्रज्ञानाचा हुकूमशहा कारवाईसुद्धा करू शकेल. भविष्यात
निर्माण होणारी ही मोठी समस्या आता कुणाच्या लक्षातही येत नाही. पण ही लक्षात घेऊन आपण आत्ताच पावले टाकली तर या तंत्रज्ञानाचा हुकूमशहा वेळीच आटोक्यात येईल. अन्यथा तंत्रज्ञानाचा हुकूमशहा आपल्यावर हुकूमत तर गाजविलच, पण आपल्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. गजानन पाटील