देवरुखला वादळाने झोडपले

By Admin | Updated: May 15, 2015 23:32 IST2015-05-15T23:03:48+5:302015-05-15T23:32:00+5:30

तरूण जखमी : वाहतूक ठप्प, वीज खंडित, लाखोंची हानी

Devrukhal was shocked by the storm | देवरुखला वादळाने झोडपले

देवरुखला वादळाने झोडपले

देवरुख : संगमेश्वर तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास ठिकठिकाणी झालेल्या वादळाने लाखोंची हानी झाली आहे, तर देवरुखमध्ये झालेल्या जोरदार वादळामुळे शिवाजी चौकात विद्युत वाहिन्या तुटल्याने सायंकाळी ४ वाजल्यापासून साडेसातपर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबरोबरच संगमेश्वर - देवरुख राज्य मार्गावर साडवली परिसरात तब्बल ९ ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. संगमेश्वर परिसरातील धामणी, आरवली, माखजन, काटवली, सायले तसेच देवरुखसह अन्य परिसरात सायंकाळी चांगलाच पाऊस बरसल्याने जनतेचे हाल झाले. गेले दोन दिवस उकाड्याने नागरिकांना हैराण करुन सोडले होते तर शुक्रवारी पूर्णत: ढगाळ वातावरण होते. यावेळी सायंकाळी जोरदार वादळ झाले. यामध्ये शिवाजी चौक देवरुख येथील विद्युत वाहिनी तुटल्याने शरद जाधव हा बेलारी-बौद्धवाडी येथील ३२ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. विजेच्या वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने तो फेकला गेला. या शॉकमध्ये गंभीर झाला होता. त्याला तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, साडवली परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, ही झाडे त्वरित हटवण्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यात असून, काही घरांचेदेखील नुकसान झाले आहे. मात्र, नुकसान किती झाले, याचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. (प्रतिनिधी)


वादळी पावसाने संगमेश्वर तालुक्यामध्ये हाहाकार माजवला. लाखो रुपयांच्या हानीसह वीज वाहिन्या तुटल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी वादळात मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Devrukhal was shocked by the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.