रत्नागिरी उपकेंद्राच्या उपकेंद्र संचालकपदी नरेंद्र तेंडोलकर, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:21 IST2018-07-05T17:19:00+5:302018-07-05T17:21:05+5:30
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे.

रत्नागिरी उपकेंद्राच्या उपकेंद्र संचालकपदी नरेंद्र तेंडोलकर, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप येथील डॉ. तेंडोलकर हे गेली अकरा वर्षे देवरूखच्या आठल्ये - सप्रे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्त्व हीच त्यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे या उपकेंद्राला समन्वयक हेच प्रमुख पद होते.
नव्या विद्यापीठ कायद्यानुसार उपकेंद्रांमध्ये प्रभारी संचालक (इन्चार्ज डायरेक्टर) हे प्रमुख पद निर्माण करण्यात आले आहे. कायद्यानुसार मुंबई विद्यापीठाने या पदावर डॉ. तेंडोलकर यांची नियुक्ती केली आहे.
या पदासाठी अत्यंत योग्य माणसाची नियुक्ती झाली असल्याची प्रतिक्रिया उपकेंद्र अभ्यास समितीचे माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी व्यक्त केली.
शिक्षण मराठी शाळेतच
डॉ. तेंडोलकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झारापसारख्या छोट्याशा गावातच झाले आहे. त्यानंतर त्यांनी सावंतवाडीमध्ये पंचम खेमराज महाविद्यालयात पदवी घेतली. विज्ञान संस्था मुंबई येथे त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेट मिळवली.