कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा खो-खो संघटनेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST2021-05-26T04:32:09+5:302021-05-26T04:32:09+5:30
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा खो-खो संघटनेचा निर्णय
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहिती संघटनेकडे पाठविण्याचे आवाहन राज्य संघटनेचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. राज्य शासनाने ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व उद्याेगधंदे बंद करण्याबाबत कडक निर्बंध घातले आहेत. या कडक निर्बंधामुळे कित्येक मध्यमवर्गातील कुटुंबाची दोनवेळच्या जेवणाची देखील आबाळ झाली आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय खो-खो खेळाडूंची कुटुंबे होरपळली आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाग्रस्त गरीब होतकरू खेळाडूंना आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅॅड. गोविंद शर्मा यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळलेले खो-खो खेळाडू जर कोरोनाबाधित असतील, अशा गरीब खेळाडूंची माहिती राज्य संघटनेकडे व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पाठवावी, असे पत्र जिल्हा सचिवांना पाठविण्यात आले आहे.