खेडचे सुपुत्र अमर आंब्रे यांचा शहीद दिनीच अपघाती मृत्यू, निगडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:42 IST2017-11-28T13:34:04+5:302017-11-28T13:42:36+5:30
खेड तालुक्यातील चिरणी गणशेवाडीतील सुपुत्र जवान अमर आत्माराम आंब्रे यांचा राज्यस्थान कोटा येथील अत्यंत निर्जनस्थळी देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. शहीद दिनी दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच ही दुर्घटना घडली. पुणे येथील निगडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँड पथकाची सलामी आणि हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आंब्रे यांना मानवंदना देण्यात आली.

खेडचे सुपुत्र अमर आंब्रे यांचा शहीद दिनीच अपघाती मृत्यू, निगडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
खेड : खेड तालुक्यातील चिरणी गणशेवाडीतील सुपुत्र जवान अमर आत्माराम आंब्रे यांचा राज्यस्थान कोटा येथील अत्यंत निर्जनस्थळी देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. शहीद दिनी दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच ही दुर्घटना घडली.
पुणे येथील निगडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँड पथकाची सलामी आणि हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आंब्रे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, चिरणी गावातील मुंबईस्थित आणि पिंपरी चिंचवडस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दुर्घटनेमुळे चिरणी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमर आंब्रे केवळ ३५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील आई, पत्नी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. हे सर्व कुटुंब पुण्यामध्ये राहते.
चिरणी गावातील गणेशवाडीमध्ये अमर आंब्रे यांचे घर आहे. ते ४ मराठा लाईट इन्फ्रंटीमध्ये नाईक पदावर कार्यरत होते. सध्या ते राज्यस्थानमधील कोटा येथील देशाच्या सीमेचे रक्षण करण्याचे काम करीत होते.
गेली १५ वर्षे सैन्यदलात ते कार्यरत होते. याआधी त्यांनी आसाम, अरूणाचल, मेघालय येथे सेवा बजावली आहे. याअगोदर याच गावातील कृष्णा रामजी आंब्रे यांना नागालँड वार, सुधीर धोंडू आंब्रे यांना कारगील युध्दात देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे. या अपघाती मृत्यूची माहिती खेड येथील त्यांच्या गावी समजताच गावात शोक व्यक्त करण्यात आला.