दापोली : दापोली पोलीस स्थानकातर्फे ग्राम दत्तक याेजनेअंतर्गत जालगाव ब्राह्मणवाडी येथे जाऊन तेथील ३५ ते ४० ग्रामस्थांना मास्क वाटप करून ग्रामस्थांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जालगाव येथे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक शेवंती महादेव वाडकर, चिंतामणी साठे, सारिका चिंतामणी साठे, सुजाता सुरेश वाडकर, सुरेश वाडकर यांचे घरी जाऊन स्वत: मास्क वाटप व ऑक्सिजन, आरोग्य तपासणी केली़ शेवंती महादेव वाडकर या घरात एकटे राहत असून त्यांना लॉकडाऊनमुळे होत असलेल्या अडचणींमुळे त्यांना किराणा माल देण्यात आला तसेच सुरेश वाडकर यांची तपासणी करत असताना ऑक्सिजन पातळी कमी आढळल्याने डॉ. विद्या दिवाण यांना घेऊन औषधाेपचार करण्यात आले. त्यानंतर कुंभारवाडी, जालगाव येथे नागरिकांना डॉ. विद्या दिवाण यांनी म्युकरमायकाेसिस या रोगापासून काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. बाैद्धवाडी जालगाव येथे नागरिकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोलनकर यांनी कोरोना या रोगापासून काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोलनकर, नीलम देशमुख यांनी ही कामगिरी केली़ यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह वाडी अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास लिंगावले, पोलीस पाटील देवेंद्र शिंदे उपस्थित होते.