भिंगळोलीतील धोकादायक झाड अखेर पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:45+5:302021-09-15T04:36:45+5:30
मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर भिंगळोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गेल्या दोन महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे झाड अखेर राष्ट्रीय ...

भिंगळोलीतील धोकादायक झाड अखेर पाडले
मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर भिंगळोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गेल्या दोन महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे झाड अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तोडले. झाड पडत असताना दुचाकीने प्रवास करणारा नाशिक येथील एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
कधीही पडले अशा धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व वनविभागाकडे आग्रही मागणी केली होती. मात्र सर्वच खात्यांनी आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकल्याने झाडे धोकादायक बनूनही हटवण्यात आली नव्हती.
यासंदर्भात मंडणगड तहसीलदारांनी स्वत: लक्ष घातले आणि झाडामुळे निर्माण होणाऱ्या अपघाताची शक्यता लक्षात घेत संबंधित खात्याला त्याबाबत सूचना केली. त्यामुळे चाकरमान्यांची प्रवासाची धामधूम सुरू असताना सायंकाळी उशिरा लाकूड तोडण्यासाठी कटर घेऊन प्राधिकरणाचे अधिकारी दाखल झाले. कटरच्या मदतीने नाममात्र धक्का देण्याचा प्रयत्न केला असता झाड खाली पडू लागले. नेमकी याच वेळी या रस्त्यावरून नाशिक येथील एक पर्यटक मुंबईकडे जात होता. या झाडाचा धक्का लागून त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर दापोली येथे उपचार सुरु आहेत.
सरकारी खात्यांच्या हलगर्जीपणाबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी ग्रामस्थ मागणी करत होते, तेव्हाच हे झाड तोडले गेले असते तर आयत्या वेळी असे प्रकार करण्याची वेळ आली नसती, अशी मते लोक व्यक्त करत आहेत.