कोकणात दुग्ध व्यवसायाला हवी ऊर्जितावस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:04+5:302021-09-10T04:38:04+5:30
आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ...

कोकणात दुग्ध व्यवसायाला हवी ऊर्जितावस्था!
आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ते ४६ रुपये प्रति लीटर दराने विकले जाते. तर काही फार्मस् त्यांच्या दुधाची विक्री थेट ग्राहकांना करतात. त्यासाठी ५५ ते ७० रुपये प्रति लीटर इतका दर आकारला जातो. यासाठी विविध ब्रॅंड व मार्केटिंगचे तंत्र वापरले जाते. यामध्ये देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहीत दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो, यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते. स्वच्छ व निर्जंतुक दुधाला यापुढे मागणी वाढेल, अशास्थितीत कोकणाला ‘सुदृढ’ बनवणारा लाखो लीटर क्षमतेचा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प चिपळुणात कार्यरत होत असल्याने तो एक दुग्धशर्करा योग मानला जात आहे. दूध प्रकल्प चिपळुणात सुरु होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. हा प्रकल्प खासगी तत्त्वावर असला तरी त्याचे संचालन सहकारी पद्धतीने असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख, चिपळूण, खेड तालुक्यांत सहकारी तत्त्वावरचे छोट्या व मध्यम स्वरुपाच्या दूध प्रकल्पांचे प्रयत्न झाले, पण आपल्या कोकणी वृत्तीने त्याचा घातच केला. प्रकल्पाचे भवितव्य हे संकलन होणाऱ्या दुधावर आणि बाय प्रॉडक्टवर असते. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व प्रकल्पासाठी प्रामाणिकपणे दूध देण्याचे काम केले तर कोकण अशा प्रकल्पांवर सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही. प्रारंभी काळात ३० हजार लीटर दूध संकलन लक्ष्य असलेल्या या दूध प्रकल्पाची कमाल मर्यादा दीड लाख लीटर आहे. कोकणासाठी ही एक मोठी ‘संधी’ आहे. हा कृषी प्रकल्प यशस्वी झाला, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेणार आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला दुग्ध व्यवसायाशी निगडीत २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था सुरु आहेत. तब्बल १६५ दुग्ध संस्था बंद आहेत. शासनाकडून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न झाल्याने जिल्ह्याचा एकूणच दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत आहे. मात्र, आता या व्यवसायाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत.
- संदीप बांद्रे