ऐन गणेशोत्सवात राजापुरात नैराश्यातून दाेघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:29+5:302021-09-17T04:38:29+5:30
तालुक्यातील ताम्हाणे पहिली वाडी येथील अक्षय श्रीपत वाफेलकर (२५) याने मंगळवारी (दि. १४)घरामध्ये लाकडी खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या ...

ऐन गणेशोत्सवात राजापुरात नैराश्यातून दाेघांची आत्महत्या
तालुक्यातील ताम्हाणे पहिली वाडी येथील अक्षय श्रीपत वाफेलकर (२५) याने मंगळवारी (दि. १४)घरामध्ये लाकडी खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर येळवण-मालपवाडी येथील राकेश पांडुरंग मालप (२५) याने गुरुवारी (दि.१६) गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिरातील खांबाला नायलॉनच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
ताम्हाणे येथील आत्महत्याप्रकरणी अक्षयचे वडील श्रीपत रामचंद्र वाफेलकर यांनी रायपाटण दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. अक्षय हा दारूच्या आहारी गेला हाेता. १४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता घरातील सर्वजण गणपती विसर्जनासाठी गेले असता. तो विसर्जनस्थळी दिसला नव्हता. दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान गणपती विसर्जन करून सर्वजण घरी परत आले असता दरवाजाला आतून कडी हाेती. दरवाजा धक्का मारून उघडला असता अक्षयने घरातील खांबाला गळफास लावून घेतल्याचे दिसले.
तसेच येळवण येथील आत्महत्याप्रकरणी ग्रामस्थ चंद्रकांत शंकर मालप यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. राकेश याचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी मुंबई येथून आलेल्या आई-वडिलांसोबत माहेरी निघून गेली होती तेव्हापासून त्याची मन:स्थिती ठीक नव्हती तसेच त्याला दारुचे व्यसनही लागले होते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान त्याने जवळच्या असलेल्या देव रवळनाथ मंदिरातील खांबाला नायलॉनच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले.
या दाेन्ही घटनांची पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, दाेन्ही प्रकरणांचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर करत आहेत. या दोन्ही घटनांनंतर तत्काळ राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी भेट देऊन पाहणी केली.