आठवडाबाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:22+5:302021-03-23T04:33:22+5:30
राजापूर : शासनाने शिमगोत्सवावर निर्बंध लादले आहेत. उत्सवात सहभागी होणा-या २५ जणांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र, बाजारपेठा ...

आठवडाबाजारात गर्दी
राजापूर : शासनाने शिमगोत्सवावर निर्बंध लादले आहेत. उत्सवात सहभागी होणा-या २५ जणांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र, बाजारपेठा तसेच आठवडाबाजारात शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करून मुंबईहून परत आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका वाढला आहे.
काँग्रेसचे उपोषण
रत्नागिरी : केंद्र सरकारचे कृषी विधेयक, वाढू लागलेली महागाई या विषयांवरून काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, दिनांक २४ मार्च रोजी जिल्हाभरात उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्येक जिल्ह्यातील विभागात पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.
पूल रखडला
दापोली : दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना जोडणा-या महत्त्वाच्या केळशी खाडीवरील पुलाचे बांधकाम १६ वर्षे रखडल्याने त्यामुळे या दोन तालुक्यांतील होणारा संपर्क अवघड झाला आहे. रखडलेल्या सागरी पुलाचे बांधकाम होण्यास किती वर्षे लागणार, असा प्रश्न या दोन तालुक्यांतील जनतेमधून विचारला जात आहे.
कोरोनाबाबत जनजागृती
रत्नागिरी : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुती मास्क विक्री केंद्राचा शुभारंभ उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या हस्ते झाला. यावेळी या महिलांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
अखेर भरली बिले
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात भरमसाट दराने आलेली बिले अनेक ग्राहकांनी सवलत मिळावी, या मागणीसाठी भरली नव्हती. मात्र, ही बिले भरावी लागणार, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही वीजबिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार, या भीतीने अनेक उद्योजकांनी बिले भरली आहेत.
शीतगृहांमध्ये गर्दी
चिपळूण : दिवसेंदिवस उष्मा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर जाऊ लागल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या दिवसभर विविध शीतगृहांमध्ये तसेच आइस्क्रीम पार्लरमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
सिग्नल स्थगित करा
रत्नागिरी : शहरातील जेलनाका चौकातील रस्त्यावर नगर परिषदेतर्फे खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे सिग्नल स्थगित करण्यात यावेत, यासाठी आवश्यक असल्यास वाहतूक नियमनासाठी अधिक पोलीस तैनात करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी वाहतूक शाखेकडे केली आहे.
ठेकेदाराबाबत नाराजी
आवाशी : खेड तालुक्यातील चोरवणे गावात हनुमंतवाडी येथे रस्ता डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने या कामगारांसाठी शौचालयाची व्यवस्था न केल्यास गैरसोय होत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या कामगारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
कोथिंबीर स्वस्त झाली
रत्नागिरी : पूर्वी २५ ते ३० रुपयांंपर्यंत कोथिबिरीच्या एका जुडीचा दर गेला होता. मात्र, आता हा दर खाली आला असून सध्या जुडी १० रुपयाला दिली जात आहे. त्याचबरोबर टोमॅटोचे दरही खाली आले आहेत. पूर्वी ८० रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो आता ३० ते ३५ रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत.
परीक्षेची प्रतीक्षा
लांजा : बारावीची परीक्षा आता थोड्या दिवसांवर आली आहे. या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा नुकतीच झाली आहे. त्यामुळे आता हे विद्यार्थी अंतिम परीक्षेची प्रतीक्षा करीत आहेत. परीक्षेचा कालावधी जवळ आल्याने सध्या या विद्यार्थ्यांना पाच ते सहा तास अभ्यास करावा लागत आहे. सध्या हे विद्यार्थी अभ्यासात व्यग्र झाले आहेत.