रत्नागिरी : पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रियकराला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १४ डिसेंबर २०२० रोजी जयगड येथील डेक्कन ओव्हरसीज प्रा.लि. कंपनीच्या गेस्टहाउसच्या खाेलीमध्ये घडली होती. मारुती राजाराम मोहिते (५५, रा.घुणकी-हातकणंगले, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे.मारुती मोहिते हा डेक्कन ओव्हरसीज कंपनीत कामाला होता, तसेच महिला ही त्या कंपनीमध्ये जेवण आणि साफसफाईचे काम करायची. मृत महिला ही आपल्या पतीशी फोनवर बोलते, या गोष्टीचा आरोपी मोहिते याला राग यायचा. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी हे दोघ कंपनीच्या गेस्टहाउसमधील खाेलीमध्ये असताना त्या महिलेला पतीचा फोन आला. ती फोनवर बोलत असल्याचे पाहून मारुती मोहिते याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात किचन ट्रॉलीची पट्टी मारली. रक्ताच्या थारोळ्यात महिलेला साेडून त्याने तिथून पळ काढला.काही वेळाने त्या ठिकाणी कंपनीचा एक कामगार आला असता, त्याला रक्ताच्या थाराेळ्यात पडलेली महिला दिसली. त्याने आरडाओरडा करताच, कंपनीतील इतर कामगारांनी तिथे येऊन महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना १६ डिसेंबर, २०२० रोजी तिचा मृत्यू झाला होता.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पुष्पराज शेट्ये यांनी १९ साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ अन्वये दोषी मानून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तसेच भारतीय दंड विधान कलम ३४३ नुसार दोषी ठरवत १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात ॲड.पुष्पराज शेट्ये यांना ॲड.श्रुती शेट्ये यांनी साथ दिली, तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अनंत जाधव, पोलिस हवालदार वंदना लाड, पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी काम पाहिले.
चुलत सासऱ्यांकडून फिर्यादया प्रकरणी महिलेचे चुलत सासरे रवींद्र वझे यांनी जयगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी प्रथम भारतीय दंड विधान कलम ३०७ व ती महिला मृत झाल्यानंतर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जयगडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी संशयिताला अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होेते.