CoronaVirus Lockdown : आपल्या राज्यात जाण्यासाठी तामिळनाडूची मुले आक्रमक, मोर्चा काढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 14:53 IST2020-05-09T14:52:03+5:302020-05-09T14:53:39+5:30
लॉकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील एमआयडीसी भागात अडकलेल्या तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील मुले आता आपल्या राज्यात परत जाण्यासाठी उतावीळ झाली आहेत. शनिवारी सुमारे १५० मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत आरोग्यमंदिर येथे या मुलांना रोखले.

CoronaVirus Lockdown : आपल्या राज्यात जाण्यासाठी तामिळनाडूची मुले आक्रमक, मोर्चा काढण्याचा प्रयत्न
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रत्नागिरी शहरातील एमआयडीसी भागात अडकलेल्या तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील मुले आता आपल्या राज्यात परत जाण्यासाठी उतावीळ झाली आहेत. शनिवारी सुमारे १५० मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत आरोग्यमंदिर येथे या मुलांना रोखले.
आपल्या गावी जाण्यासाठी आक्रमक झालेल्या या मुलांची उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी यशस्वी शिष्टाई करीत समजूत काढली.
शहरातील एमआयडीसी भागातील एका आस्थापनेत ४५० मुले तामिळनाडूतील, ५४ मुले केरळ तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातील अशी मिळून सुमारे ५४० मार्केटिंगचे काम करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात त्यांचे हे काम बंद झाल्याने या मुलांची राहण्याची सोय असली तरी जेवणाची आबाळ होऊ लागली. मात्र, तहसील कार्यालय, विविध संस्था, शिवभोजन योजना आदींमधून या मुलांच्या जेवणाची सोय झाली होती.
मात्र, आता या मुलांकडे पैसेच नसल्याने त्यांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यासाठी प्रशासनाने सोय करावी म्हणून शनिवारी सकाळी तामिळनाडुतील सुमारे १५० मुले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालली होती. मात्र, पोलीस यंत्रणेला ही माहिती कळताच या मुलांना आरोग्य मंदिर येथे रोखण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या मुलांची समजूत काढली. आणि त्यांना तीन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देऊन घरी पाठविले.