CoronaVirus Lockdown : प्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:31 IST2020-05-22T18:29:51+5:302020-05-22T18:31:23+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

CoronaVirus Lockdown : प्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बस
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, लांजा, देवरुख या आगारातून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, २२ प्रवासी असल्याशिवाय बस न सोडण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरी आगारातून सकाळपासून एकही बस सोडण्यात आलेली नाही.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हाअंतर्गत बससेवा आणि रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमांचे बंधन घालून दिले आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बससेवा सुरु करता येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
शुक्रवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गाडीतील प्रवासी संख्या मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रवासी संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस सोडता येणार नसल्याचे रत्नागिरी आगाराने ठरविले आहे.
रत्नागिरीतून दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट २२ प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येतील असा फलकच रहाटाघर येथील बसस्थानकात लावण्यात आला आहे. त्यामुळे पुरेसी प्रवासी संख्या न झाल्याने रत्नागिरी आगारातून एकही बस सोडण्यात आलेली नाही.