Corona patient at SMS Hospital at Bharne | भरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण

भरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण

ठळक मुद्देभरणे येथील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णग्रामपंचायतीसोबतच तालुका आरोग्य विभागदेखील अनभिज्ञ

खेड : तालुक्यातील भरणे येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच असलेल्या एसएमएस या खासगी रुग्णालयात मंगळवारी १३ रोजी १५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याची बाब निदर्शनास आली असून, गेल्या दोन दिवसांत येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत भरणे ग्रामपंचायतीसोबतच तालुका आरोग्य विभागदेखील अनभिज्ञ असल्याचे समजते.

शहरानजीकच्या भरणे येथील एसएमएस रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून उपचार करण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी, दि. १२ रोजी येथे उपचार घेत असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकाराकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. या रुग्णालयात मंगळवारी दि. १३ रोजी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत रुग्णालयात संपर्क साधला असता तेथे उपस्थित डॉ. पवार यांनी या रुग्णालयात आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केले असून, सध्या ४ रुग्ण अतिदक्षता विभागात, तर ११ रुग्ण जनरल वॉर्डात दाखल आहेत. काही कोरोना संशयित रुग्णांवरही उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयातील डॉ. पवार यांच्यासोबत व रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परमेश्वर गौड यांनी येथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, रुग्णालय परिसरात कोठेही या रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल असल्याची सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. रुग्णांचे नातेवाईक व अन्य आगंतुक यांचा रुग्णालयात मुक्त संचार आहे.

या रुग्णालयात पंधरा कोरोना रुग्ण दाखल असल्याचे भरणे ग्रामपंचायतीला माहिती नसल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर स्पष्ट झाले आहे. आमच्या रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी परवानगी दिल्याची माहिती डॉ. गौड यांनी आपल्याला दूरध्वनीवरून दिल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी सांगितले. मात्र, कोणतीही कागदपत्र दाखवलेली नसल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: Corona patient at SMS Hospital at Bharne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.