प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:26+5:302021-06-01T04:23:26+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सामंत सतत धडपडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर त्यांनी सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर ...

Cooperate with the administration | प्रशासनाला सहकार्य करा

प्रशासनाला सहकार्य करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सामंत सतत धडपडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर त्यांनी सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारीही कोरोना महामारीमध्ये जोमाने काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आज गरज आहे. लोकांचे जीव जात असताना राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने काम करण्याची आवश्यकता आहे. उगाच राजकारण करून जिल्ह्याला अडचणीत आणण्यापेक्षा या महामारीच्या वर्षभराच्या कालावधीत प्रत्येकाने स्वत: आपण काय केले आणि आपणाला पुढे काय करायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. एकमेकांचे पाय खेचण्याचे काम बंद करावे, अशी प्रत्येक जण अपेक्षा व्यक्त करीत आहे. खेकडा वृत्ती सोडून सामंत यांना आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेऊन लोकांचे जीव कसे वाचतील, यावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अशा लोकांना उद्ध्वस्त झालेेले कुटुंबीय कधीच माफ करणार नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात २०० कोविड केअर केंद्रे उभारण्यासाठी प्रत्येकाने राजकीय हेवेदावे सोडून प्रशासनाला कसे सहकार्य करता येईल, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर कोरोना बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनासह सर्वच यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंत्री सामंत यांनी ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये कोविड केअर केंद्र उभारणीला दिलेले प्राधान्य हे वाढलेले कोरोना रुग्ण आणि तिसरा लाटेशी सामना करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. त्यामुळे आज कोरोनाविरोधातील लढाईत सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण विसरून एकत्रितपणे लढा देणे जिल्हावासीयांसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी राजकारण्यांनी राजकारण न करता समाजकारणाला महत्त्व देण्याची फार आवश्यकता आहे. राजकारण कायम करतच राहणार आहात; पण वाचलात तर. यामध्ये गरीब, सर्वसामान्य कोरोनाचे बळी ठरताहेत, असे नाही. तर प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारण करण्यापेक्षा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी कोरोनाबाधितांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कसे सहकार्य करता येईल, याकडे लक्ष द्यावे. कारण आज कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे गरजचे आहे.

जिल्ह्यावर वाईट वेळ आहे. त्यासाठी राजकारण कुठे करावे आणि कितपत करावे, यालाही मर्यादा आहे. या बाबीचे भान सुटले की एखादा राजकीय पक्ष आणि नेत्याविषयी लोकांमध्ये असलेली आपुलकी, सहानुभूती कमी होऊ लागते. जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीशी दोन हात करण्याऐवजी राजकीय पक्ष व त्यांच्या काही पुढाऱ्यांकडून आतापर्यंत दोषारोप ठेवण्यावरच भर देण्यात आला असून हे अयोग्य आहे. चुका या प्रत्येकाकडून होतच असतात. त्याप्रमाणे प्रशासन चुकत असेल तर त्याबाबत जाब विचारलाच पाहिजे. केवळ त्यांचे दोष काढत बसून चालणार नाही तर त्यांच्याकडून काम करवून घेणे आवश्यक आहे. आज अशी परिस्थिती आहे की कोरोनामुळे गेलेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना सहकार्य कसे करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करून त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या उलट राजकारण करीत बसणे, हे जिल्हावासीयांसाठी तोट्याचे असून, त्यासाठी जे काम करताहेत, त्यांच्या मदतीसाठी पुढे येऊन आपणही समाजासाठी काय तरी करीत आहोत, असे समजून मनापासून सहकार्य करावे.

- रहिम दलाल

Web Title: Cooperate with the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.