नियंत्रण समित्या करणार
By Admin | Updated: March 28, 2015 00:06 IST2015-03-27T22:06:46+5:302015-03-28T00:06:10+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : विद्युत वितरणचे नवे धोरण

नियंत्रण समित्या करणार
रत्नागिरी : महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी, तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी राज्यशासनाने जिल्हा निहाय तसेच तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय जाहीर केला आहे.जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना जिल्हाधिकारी तर तालुकास्तरीय समितीची स्थापना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील नियंत्रण समितीचे अध्यक्ष त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तर महावितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. जिल्हास्तरीय समितीतील शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या सहमतीने जिल्हाधिकारी व महावितरणचे मुख्य अभियंता करणार असून, एका महिन्याच्या आत या समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
या जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार, विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता तसेच घरगुती, व्यापारी, औद्योगिक व कृषी ग्राहकांचे प्रतिनिधी व विद्युत क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश यात राहणार आहे. तालुकास्तरीय नियंत्रण समितीच्या अध्यक्षाची नेमणूक पालकमंत्र्याच्या निर्देशाप्रमाणे करण्यात येईल. मोठे मतदार क्षेत्र असलेल्या आमदारांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असून, या समितीचे सदस्य सचिव महावितरणचे उपविभागिय अभियंता राहणार आहेत. या समितीत आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच घरगुती, व्यापारी, औद्योगिक व कृषी ग्राहकांचे प्रतिनिधी व विद्युत क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या समित्या महावितरणतर्फे सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेणे, वीज बिलाची वसुली, विजेचा गैरवापर व ते रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या कृषीपंप व घरगुती ग्राहकांच्या जोडण्याचा आढावा घेणे, ग्राहकांना खात्रीशीर विद्युत पुरवठा व चांगली सेवा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समितीच्या कार्यकक्षेतील सर्व विभाग भारनियमनमुक्त करणे, अशा विविध वीज विषयक बाबींबाबत या समितीतर्फे त्रैमासिक आढावा घेण्यात येईल. या समितीने सुचवलेल्या सूचना अथवा मार्गदर्शन शासनस्तरावर पाठवण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली.
महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी विविध विषयावर लक्ष केंद्रीत केले असून आता या समित्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुली, विजेचा गैरवापर रोखणे, वीज जोडण्या वेळेत मिळणे, घरगुती व व्यावसायिक ग्राहकांसाठी विशेष सुविधा मिळविताना सोय होणार आहे. या समित्यांची स्थापना लवकरच होणार असून तालुका व जिल्हा समितीवर या क्षेत्रातील तज्ञ निवडण्यात येणार असल्याने विद्युत वितरणचा कारभार अधिक लोकाभिमुख होणे शक्य होण्याची खात्री देण्यात येत आहे. मात्र, या समित्यांकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
समित्यांच्या स्थापनेमुळे गती
पारदर्शक कारभार व प्रभावी उपाययोजनांसाठी निर्णय.
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार.
पालकमंत्री प्रमुख, परिमंडल मुख्य अभियंता सदस्य सचिव.
समित्या घेणार विविध विकास कामांचा आढावा.
समित्यांवर तज्ज्ञांची नेमणूक करणार.
कारभार लोकाभिमुख होण्याचे प्रयत्न.