कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवचच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:10+5:302021-05-08T04:34:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्यावर्षी कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव वाढू लागताच अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर माेठ्या प्रमाणावर ताण आल्याने ऑगस्ट ...

Contract employees at Covid Care Center have no insurance cover | कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवचच नाही

कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवचच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्यावर्षी कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव वाढू लागताच अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर माेठ्या प्रमाणावर ताण आल्याने ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कंत्राटी पद्धतीने डाॅक्टर्स, परिचारिका आणि वाॅर्डबाॅय यांची नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा त्यांना सेवामुक्त करण्यात आले. जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे ३००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आता काेरोना वाढल्यानंतर पुन्हा यापैकी काहींना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, कोरोना काळात धोका पत्करून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या जीविताचा धोका लक्षात न घेता शासनाने त्यांना कोरोना विमा कवचापासून आतापर्यंत वंचित ठेवले आहे.

गेल्यावर्षी तीन महिने धोका पत्करून हे कर्मचारी अगदी १२ ते २० तास कोरोनाग्रस्तांच्या सहवासात राहून काम करत होते. त्यांच्यापैकी काहीजण पाॅझिटिव्हही झाले. मात्र, बरे होऊन आल्यानंतर त्यांनी पुन्हा सेवा सुरू केली. अगदी रुग्णांना भरविणे, आंघोळ घालणे, चादरी बदलणे आदी कामे हे कर्मचारी आनंदाने करत हाेते. अनुभव असल्याने शासनाने आपल्याला सेवेत कायम करावे, ही मागणी हे कर्मचारी करीत आहेत. आता पुन्हा त्यांना आता दोन महिन्यांसाठी नियुक्त केले आहे. मात्र, आताही त्यांची सुरक्षितता लक्षात न घेता त्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे.

आम्ही जवळपास पाच महिने सेवेत आहोत. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात कमी केले आणि आता कोरोना वाढल्यावर पुन्हा सेवेत घेतले आहे; परंतु आमच्या जीवाला धाेका असूनही अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला विम्याची सुरक्षितताही दिलेली नाही. शासनाचा निर्णय भविष्यात होईल, असे सांगितले जात आहे.

- अंजली वाघाटे, कंत्राटी कर्मचारी

आरोग्य विभागात कर्मचारी अपुरे आहेत. रिक्त असलेल्या पदांवर आम्हाला घ्या, अशी शासनाकडे गेल्यावर्षापासून मागणी आहे. मात्र, ती अजूनही मान्य झालेली नाही. आता पुन्हा दोन महिन्यांसाठी नियुक्त केले आहे. त्यानंतर पुन्हा काय, ही चिंता आहेच. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षणही मिळायला हवे.

- देवेंद्र हरचेकर, कंत्राटी कामगार

कोरोनाकाळात कुठलीही भीती न बाळगता आम्ही कोरोना रुग्णालय तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये दिवसरात्र सेवा दिली आहे. शासनाने आमच्या या सेवेचा विचार करून आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्यासाठी विमा योजना लागू करावी, तसेच आम्हाला कायम सेवेत घ्यावे.

- अजिंक्य सिदये, कंत्राटी कामगार

कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे कंत्राट

गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. मात्र, आराेग्य यंत्रणेकडील अपुरे मनुष्यबळ असल्याने यंत्रणेवरील ताण वाढला.

राज्यात प्रतिदिन ७०० रुपये मानधनावर परिचारिका आणि प्रतिदिन ४०० रुपये मानधनावर वाॅर्डबाॅय यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली.

ऑक्टोबर महिन्यात कोरोना कमी होताच या कर्मचाऱ्यांना अचानक कमी केल्याने त्यांच्यावर रोजगार गमावण्याची वेळ आली.

पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच जिल्हा प्रशासनाने यापैकी काही कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहे. त्यांना २ जूनपर्यंतची नियुक्ती दिली असली तरी कोरोना संपेपर्यंत त्यांची नियुक्ती असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत ३५ जण पाॅझिटिव्ह

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने सुमारे ३ हजार डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय अशी विविध पदे भरण्यात आली होती. कोरोनाबाधितांच्या संपर्कात राहून हे कर्मचारी त्यांची सेवा करत असल्याने त्यांच्यापैकी सुमारे ३२ ते ३५ कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांची सेवा पुन्हा सुरू झाली. आरोग्य यंत्रणेत काम करण्याचा अनुभव मिळाल्याने त्यांना आता या क्षेत्रात कायमस्वरूपी काम करण्याची इच्छा आहे.

शासकीय सेवेत सामावून घ्या....

कोरोना संकटात रूग्ण सेवा करणारे हे कर्मचारी शासकीय सेवेत सामावून घेण्याची शासनाकडे मागणी करत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात राबवून घेऊन त्यांना पुन्हा वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, अन्यथा कोरोना काळ संपताच समविचारी मंंच महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा मंचाचे प्रमुख बाबा ढोल्ये यांनी दिला आहे.

Web Title: Contract employees at Covid Care Center have no insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.