नरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:56 IST2020-02-25T15:40:56+5:302020-02-26T14:56:54+5:30
मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता.

नरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडी
कणकवली : मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता.
गोव्याच्या दिशेने सिलेंदर रतन (रा. पंजाब) हा चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक एम. एच. ४३- बी.जी. ३४५७) घेऊन सोमवारी सायंकाळी निघाला होता. कणकवली येथे तो आला असता महामार्ग चौपदरीकरण कामासाठी परावर्तित करण्यात आलेल्या रस्त्यामुळे तो गडबडला. त्याने आपला कंटेनर महामार्गावरून नरडवे रस्त्यावर नेला.
काही वेळाने आपण रस्ता चुकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने विवेकानंद नेत्रालयासमोर कंटेनर वळविला. मात्र, त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने पदपथावर कंटेनरची समोरील चाके चढली. तसेच ती तिथेच रुतली. त्यामुळे कंटेनरचा मागील भाग रस्त्यावर अडकल्याने नरडवे रस्ता बंद झाला.
त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांना कळविले. पोलीस विश्वजीत परब व आंबिटकर घटनास्थळी आले. त्यांनी एका बाजूने नरडवे रस्त्यावरील वाहतूक वळविली. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर नरडवे रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू होता.