रत्नागिरी : वक्फ बाेर्ड हे सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे खाेटे बाेलून आपल्याकडे आलेली मुस्लीम समाजाची मते पुन्हा महायुतीकडे जातील या भीतीने आराेप-प्रत्याराेप केले जात आहेत. वक्फ बाेर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखल्याचा आराेप राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून हाेणाऱ्या आराेपात काही तथ्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, वक्फ बाेर्ड मुस्लीम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेले नाही. उलट सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना न्याय देण्यासाठी आणलेले आहे.ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मांडला जाताे, त्या जमिनी खऱ्या अर्थाने मुस्लीम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या. त्याच्यावर अतिक्रमण झाले असेल तर कायदेशीर गाेष्टी करायच्या यासाठी आणलेले ते विधेयक आहे. परंतु, खाेटे बाेलून आपल्याकडे जी मुस्लीम धर्माची मते आली आहेत ती परत महायुतीकडे जातील या भीतीने काही लाेक आराेप-प्रत्याराेप करत आहेत. गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना फाेडायची आणि भाजपच्या तत्त्वावर नेऊन ठेवायची, असा आराेप उद्धव सेनेकडून करण्यात आला आहे. यावर मंत्री सामंत म्हणाले की, तुम्ही १०० पैकी ५० तरी निवडून आणायला हवी हाेती. तर आम्ही मान्य केले असते. १०० जागा घेऊन २० जागा निवडून आल्या म्हणजे तुमचा निकाल २० टक्केच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६० जागा आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे आमचा निकाल हा ८३ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरेतत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धाेका हाेता. त्यावेळी त्यांची सुरक्षा वाढवू नयेत असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षाही अचानक एका कार्यक्रमातून काढून घेण्यात आली हाेती. गिरीश महाजन यांनाही मकाेकाखाली अटक करण्याच्या दृष्टीने काही खाेट्या केसेस दाखल केल्या जात हाेत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलेली गाेष्ट तंताेतंत खरी आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.