काथ्या व्यावसायिक महिलांसाठी जोडधंदा
By Admin | Updated: November 15, 2015 23:54 IST2015-11-15T22:06:23+5:302015-11-15T23:54:56+5:30
सहकार्यातून वेंगुर्लेत फुलली झेंडू शेती

काथ्या व्यावसायिक महिलांसाठी जोडधंदा
सावळाराम भराडकर- वेंगुर्ले --काथ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना जोडधंदा देण्याच्या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे यांनी केलेल्या सहकार्यातून महिलांनी झेंडूची बाग फुलविली आहे. झेंडूच्या उत्पादनातून आर्थिक प्राप्तीतून समृद्धता निर्माण करण्यात या महिला यशस्वी झाल्या आहेत. वेंगुर्ले कॅम्प येथे महिला काथ्या कामगार आौद्योगिक सहकारी संस्थेच्या दहा गुंठे क्षेत्रात कलकत्ता आॅरेंज या झेंडूच्या फुलांची नाविन्यपूर्ण अशी फुललेली शेती जिल्ह्यात नावलौकीक मिळवित आहे.
महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रकल्पातून वेंगुर्ले कॅम्प येथे महाराष्ट्र राज्यातील पहिला काथ्या व्यवसाय महिला चालवतात. संस्थेचे मार्गदर्शक एम. के. गावडे यांच्यामार्फत काथ्या व्यवसाय वाढीबरोबरच नवनवीन उत्पादने कशी घ्यावीत, याबाबत वेळोवेळी याची माहिती दिली जाते. या प्रकल्पाच्या प्रवर्तक व महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांचे या महिलांना मार्गदर्शन लाभते. काथ्या प्रकल्पाच्या जागेत काथ्या व्यवसाय न करता महिलांना नाविन्यपूर्ण शेतीचा अभ्यास व्हावा, या हेतूने गावडे यांनी महिलांना एकत्रित करून प्रकल्पाच्या दहा गुंठे क्षेत्रात अत्याधुनिक कलकत्ता आॅरेंज या झेंडू फुलाची शेती केली. सुमारे साडेतीन हजार रोपे या क्षेत्रात लागवड केली असून, दिवसाकाळी ४० किलो झेंडूचे उत्पादन मिळत आहे. येथीलच महिला व पुरूष कामगार या झेंडू शेतीत नियमित पाणी, सेंद्रीय खत, कोकोपीठ व औषध फवारणी करून त्या झेंडूच्या रोपांची निगा राखतात.
जुलै महिन्यात लागवड केलेल्या या झेंडूच्या शेतीतून दसऱ्यानंतर दीपावलीत या झेंडूच्या फुलांना अधिक बहर येत आहे. स्थानिक बाजारपेठेत ही झेंडूची फुले १०० ते १२० किलो भावाने विक्री होते. काही बडे व्यावसायिक येथूनच ही फुले स्थानिक बाजारपेठेबरोबर इतरही बाजारपेठेत पाठवितात. सतत दोन वर्षे ही शेती सुरू असून, यातून येथील महिला कामगारांना रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे. ही शेती पाहण्यासाठी विविध भागातून शेतीप्रेमी, तरूण फुलशेती करणारे शेतकरी येतात व त्यांना येथे मार्गदर्शन केले जाते. या नाविन्यपूर्ण शेतीचे कौतुक केले आहे.