जिल्हा रुग्णालयात नियमांचे पालन; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:56+5:302021-09-02T05:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड ...

जिल्हा रुग्णालयात नियमांचे पालन; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालय असले तरीही आता कोरोना विभाग स्वतंत्र करून नाॅन कोविड रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व डाॅक्टर्स, परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंग, आदी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला आत प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रथम त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्या नातेवाइकालाही कोरोना रुग्णालयात दाखल केले जाते. आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहेत.
याआधी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत असत. आता हा प्रकार कमी झाला आहे. कोरोनाचे नियम सर्वांसाठीच काटेकोर करण्यात आले आहेत.
रुग्णालयांमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र प्रवेश ठेवले आहेत. त्यामुळे गर्दी कमी होत आहे. येणारे मास्क वापरत आहेत का, यावरही लक्ष राहत आहे. जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे.
ओपीडी हाऊसफुल्ल
सध्या जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयासह नाॅन कोविड रुग्णालय म्हणूनही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर आजाराचे रुग्णही जिल्हाभरातून या रुग्णालयात येत आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे इतर आजारांबरोबरच तापसरी, सर्दीचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे रुग्णालयाची ओपीडी वाढली आहे.
तापसरी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढलेेे.....
सध्या पाऊस आणि मध्येच उन्हाळा असे संमिश्र वातावरण असल्याने नागरिकांमध्ये तापसरी, खोकला, सर्दी - पडसे, आदी आजार बळावले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाच्या चाचण्या आरोग्य विभागाकडून वाढविण्यात आल्या आहेत.
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत...
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अथवा येणाऱ्या व्यक्ती या काेरोनाच्या सुपर स्प्रेडर ठरू नयेत, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.
रुग्णाच्या एकाच नातेवाइकाला रुग्णालयात आत साेडले जाते. त्यासाठी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यानंतरच आत येण्यासाठी पास दिला जातो. एकच नातेवाईक रुग्णासोबत राहत असल्याने रुग्णालयात हुज्जत घालण्याचे प्रकारही थांबले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही रुग्णाकडे चांगले लक्ष देण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.
- डॉ. संघमित्रा फुले,
जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.