एलईडी मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST2021-03-23T04:34:20+5:302021-03-23T04:34:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : स्थानिकरीत्या पारंपरिक पद्धतीने तसेच रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान होवू नये, यासाठी एलईडी ...

एलईडी मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : स्थानिकरीत्या पारंपरिक पद्धतीने तसेच रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान होवू नये, यासाठी एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळेआगर येथील मच्छीमारांच्या समस्यांबाबत सोमवारी रत्नागिरी येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजन साळवी,सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची उपस्थिती होती.
या ठिकाणी १२ नॉटिकल माइल्सनंतर पुढील समुद्रात मासेमारी करण्याची मुभा पर्सेसीन मच्छीमारांना असली तरी ते किनाऱ्याजवळ येताना मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान होत आहे. याकडे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, असे सामंत म्हणाले.
वेळेआगर येथे समुद्रात पॅरासिलिंगमुळे मासेमारीकरिता मासे उपलब्ध होत नाहीत, याचा त्रास पाच हजार मासेमार कुटुंबांना होतोय. त्यामुळे पॅरासिलिंग बंद करण्याची मागणी स्थानिक मासेमारांनी या बैठकीत केली. याबाबत एक समिती स्थापन करुन अभ्यासाअंति निर्णय घेतला जावा. तोवर येथील पॅरासिलिंग बंद ठेवण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
मत्स्य विभाग, मेरीटाइम बोर्ड, विद्यापीठातील अभ्यासक यांच्या समावेशासह समिती गठित करून याबाबत अहवालानंतर अंतिम कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सिंधुदुर्गातील विविध रस्ते व बांधकाम याबाबत नंतर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.