निर्माल्य कलशात दीड टन निर्माल्य गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:01+5:302021-09-18T04:34:01+5:30
चिपळूण : नगर परिषदेने शहरातील सहा ठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य कलशात दीड टन निर्माल्य गोळा झाले. तसेच काही गणेश भक्तांनी ...

निर्माल्य कलशात दीड टन निर्माल्य गोळा
चिपळूण : नगर परिषदेने शहरातील सहा ठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य कलशात दीड टन निर्माल्य गोळा झाले. तसेच काही गणेश भक्तांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करून कोरोनाचे नियम पाळले.
तीन दिवसांपूर्वी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत पाच दिवसांच्या ९ हजार ३५४ घरगुती, तर शहरातील वेस मारुती या एका सार्वजनिक गणरायांसह गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे भक्तगणांकडून पालन करण्यात आले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी नदीकिनारी बहादूरशेख नाका, बाजारपूल आदी सहा विसर्जनस्थळी निर्माल्य कलश व तीन ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या कलशांमध्ये दीड टन निर्माल्य गोळा झाले असून, त्यापासून आता खतनिर्मिती केली जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे महेश जाधव, प्रसाद साडविलकर, वैभव निवाते, विनायक सावंत, मोहन गोलामडे, संदेश टोपरे, ऋषिकेश पाथरे, मनोहर शेट्ये, वलिद वांगडे आदींनी प्रयत्न केले. अनंत चतुर्थी दिवशीही निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.
अशी व्यवस्था राहणार असून नागरिकांनी नद्यांचे होणारे प्रदूषण लक्षात घेता निर्माल्य कलशातच द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी शिंगटे यांनी केले आहे.