बचतगटांच्या सक्षमतेसाठी कोकण रेल्वेचेही सहकार्य
By Admin | Updated: March 17, 2015 00:10 IST2015-03-16T23:14:56+5:302015-03-17T00:10:41+5:30
बी. बी. निकम : इन्सुलीतील लुपिन फाऊंडेशनतर्फे महिलांसाठीच्या विविध स्पर्धात्मक उपक्रम

बचतगटांच्या सक्षमतेसाठी कोकण रेल्वेचेही सहकार्य
कुडाळ : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे येथील महिला बचतगटांच्या उत्पादनांना कोकण रेल्वेमध्ये बाजारपेठ लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. तसेच महिला सक्षम होण्यासाठी कोकण रेल्वेही सहकार्य करेल, असे आश्वासन कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक बी. बी. निकम यांनी इन्सुली येथील लुपिन फाऊंडेशन आयोजित महिलांसाठीच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमात दिले. लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता बचतगटांच्या मालाला कोकण रेल्वेमध्ये बाजारपेठ उपलब्ध करता यावी, याकरिता या बचतगटांचे उत्पादन कसे असावे, ते कसे सादर करावे, याकरिता सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे रविवारी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक बी. बी. निकम, लुपिनचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू, नाबार्डच्या जिल्हा समन्वयक राजश्री मानकामे, इन्सुली सरपंच अश्विनी परब, पंचायत समिती सदस्य नारायण राणे, स्पर्धेचे परीक्षक ममता पाटणकर, उमा चोडणकर, अपर्णा बोवलेकर व अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना निकम म्हणाले, आपल्या येथील पदार्थ व वस्तूंची गुणवत्ता चांगलीच आहे. परंतु ती गुणवत्ता टिकून राहवी व त्या उत्पादनाची मांडणी आकर्षक करून त्याचे मार्केटींग उत्तम प्रकारे केल्यास आपल्या उत्पादनांनार चांगली किंमत येईल.यावेळी बोलताना लुपिनचे योगेश प्रभू म्हणाले, कोकण रेल्वेमध्ये महिला बचतगटांच्या मालाला आता चांगली बाजारपेठ कोकण रेल्वे प्रशासन उपलब्ध करून देणार असल्याने चांगल्या प्रतीची उत्पादने मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. यावेळी ‘मी सुगरण मी उद्योजिका’ स्पर्धा, स्वच्छ सुंदर घर परिसर स्पर्धा, बचतगटांच्या उत्पादनांची स्पर्धा व बचतगट महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांनी विविध उत्पादनाचे स्टॉल लावले होते. (प्रतिनिधी)