संस्कृत विद्यापीठ उपकेंद्राचे २६ला मुख्यमंत्री करणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:36+5:302021-09-17T04:38:36+5:30
रत्नागिरी : फार्मसीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय विधि महाविद्यालय, बार्टी विद्यापीठाचे उपकेंद्र, कवी ...

संस्कृत विद्यापीठ उपकेंद्राचे २६ला मुख्यमंत्री करणार उद्घाटन
रत्नागिरी : फार्मसीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय विधि महाविद्यालय, बार्टी विद्यापीठाचे उपकेंद्र, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र अशा अनेक उपक्रमांमुळे रत्नागिरी हे एज्युकेेशनल हब ठरणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील उपकेंद्राचे उद्घाटन २६ सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत शासकीय विधि महाविद्यालयाला परवानगी मिळाली आहे. लवकरच त्याचा सामंजस्य करार केला जाणार आहे. फार्मसीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्म.) मान्यता मिळाली असून, तोही लवकरच सुरू होत आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि काही नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम रत्नागिरीत सुरू होत आहेत. बार्टीचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केले जाणार आहे. या शैक्षणिक सुविधांमुळे रत्नागिरी हे काही वर्षांतच एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.
रत्नागिरीतील बसस्थानकासमोरील संकुलामध्ये कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होत असून, २६ रोजी मुख्यमंत्री त्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. याच संकुलामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे अतिरिक्त जागा असून, त्यात ३०० ते ३५० आसन क्षमतेचे छोटेखानी नाट्यगृह उभारण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये (पीपीपी) रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला मान्यता मिळाली आहे. काही मोठी खासगी विद्यापीठे त्यासाठी रत्नागिरीत येऊ इच्छित आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथे २५ एकर जागा त्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालय आणि परकार हॉस्पिटल या दोन्हींच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येईल का, याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.