नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे : जमीर खलिफे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:01+5:302021-06-01T04:24:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी १०० टक्के लसीकरण करणे हे महत्त्वपूर्ण ध्येय आहे. त्यामुळे राजापूर ...

नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे : जमीर खलिफे
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी १०० टक्के लसीकरण करणे हे महत्त्वपूर्ण ध्येय आहे. त्यामुळे राजापूर शहरातील नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा वा अपप्रचारावर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात लस उपलब्ध असून, लवकरच मुबलक प्रमाणावर लस उपलब्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. लसीकरणाला नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सध्या लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सध्या बंद आहे, मात्र, तेही लवकरच सुरू होईल त्यावेळी या वयोगटातील लोकांना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ४४च्या पुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू आहे. प्राधान्यक्रमाने यापूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी तर पहिला डोस घेण्यासाठीही लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत जागरूक राहून लसीकरणासाठी नावनोंदणी करून लस घेणे आवश्यक आहे.
राजापूर शहरात राजापूर ग्रामीण रूग्णालयात लस उपलब्ध करून दिली जात आहे. मंगळवार, १ जून रोजी ग्रामीण रूग्णालयात पहिल्या डोससाठी २०० लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. हे शहरातील नागरिकांसाठी असून, शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन लस घ्यावी, असे आवाहन अॅड. खलिफे यांनी केले आहे.