नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:46 IST2020-12-24T19:43:22+5:302020-12-24T19:46:12+5:30
Christmas Tourisam Ratnagiri- नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. समुद्रकिनारीही मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली आहे.

नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर
रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत. समुद्रकिनारीही मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेर पडण्यास घाबरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुनीसुनी वाटत होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पर्यटनासाठी लोक उत्सुक झाले आहेत. त्यातच पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांवरील बंदी उठली. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत.
जिल्ह्यातील समुद्रकिनारे आता पर्यटकांनी फुलून गेले आहेत. गणपतीपुळे येथे भाविक पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये, आरेवारे या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच दापोली आणि गुहागरातील वेळणेश्वर येथेही पर्यटक वाढू लागले आहेत.
शुक्रवारी नाताळची सुटी आहे. त्यालाच जोडून चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुटी आल्याने बहुतांश शासकीय अधिकारी - कर्मचारी यांनीही या सुटीचा फायदा घेत पर्यटनाचा बेत आखला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि २०२१ चे स्वागत करण्यासाठी गर्दीची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत.
राहण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या निवासांना पर्यटक अधिक महत्त्व देत असल्याने गणपतीपुळे, वेळणेश्वर या ठिकाणी महामंडळाची निवासस्थाने ३ जानेवारीपर्यंत १०० टक्के भरलेली आहेत. त्याचबरोबर खासगी व्यावसायिकांच्या निवास, न्याहरी योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- दीपक माने,
कोकण विभाग पर्यटन अधिकारी,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (रत्नागिरी)