चिपळूण : बहादूरशेखनाका येथील उड्डाणपुल कोसळल्यानंतर आक्रमक होत रास्ता रोको केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ६० जणांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांचाही समावेश आहे. उड्डाणपुल कोसळल्यानंतर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र पडसाद उमटले. कामथे येथील ईगल इन्फ्रा कंपनीच्या कार्यालासह राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. अधिकारी चर्चेस येत नसल्याच्या कारणास्तव बहादूरशेखनाका येथे महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्यात आला. याप्रकरणी नितीन ऊर्फ अबु ठसाळे, मयुर खेतले, रियाज खेरटकर, मनोज जाधव, उदय ओतारी, किशोर रेडीज, दशरथ दाभोळकर, रमेश राणे, डॉ. राकेश चाळके, गणेश भुरण, स्वप्निल शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह सुमारे ५० ते ६० राष्ट्रवादी पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कानोज करीत आहेत.
चिपळूण उड्डाणपुल दुर्घटना: रास्तारोको प्रकरणी राष्ट्रवादीच्या ६० जणांवर गुन्हा
By संदीप बांद्रे | Updated: October 18, 2023 19:16 IST