चिपळुणात शिवसेनेचेच पारडे जड
By Admin | Updated: September 20, 2014 00:27 IST2014-09-19T23:28:30+5:302014-09-20T00:27:46+5:30
या मतदार संघाने आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वादच जास्त पाहिले आहेत. बंडखोरीचे सर्वाधिक प्रकार याच तालुक्यात झाले आहेत.

चिपळुणात शिवसेनेचेच पारडे जड
आधी काँग्रेसकडे असलेला चिपळूण विधानसभा मतदार संघ १९९0पासून शिवसेनेच्याच ताब्यात आहे. २00४मधील एक निवडणूक वगळता शिवसेनेने या मतदार संघावरील आपली पकड कायम ठेवली आहे. भास्कर जाधव यांचा शिवसेना सोडून राष्ट्रवादीतील प्रवेश हा या मतदार संघातील आजवरचा सर्वात मोठा धक्का होता. भास्कर जाधव आणि रमेश कदम यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली असली तरी शिवसेनेची पकड अधिक आहे. १९९0मध्ये बापूसाहेब खेडेकर चिपळूण मतदार संघात आमदार झाले. तेव्हापासून या मतदार संघात परिवर्तन झाले. अर्थात त्यावेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली म्हणून ही जागा शिवसेनेला मिळाली होती. तत्कालीन आमदार निशिकांत तथा नाना जोशी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते आणि बाळासाहेब माटे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या दोघांची एकत्रित मते विजयी झालेल्या बापूसाहेब खेडेकर यांच्यापेक्षा अधिक होती. तेव्हापासून या मतदार संघातील चित्र पालटले.
१९९५ आणि ९९मध्ये भास्कर जाधव शिवसेनेकडून आमदार झाले. २00४ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यात राष्ट्रवादीचे रमेश कदम विजयी झाले. तसं पाहिलं तर चिपळूण पंचायत समितीत आणि चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादीचा आपला वाटा राखून आहे. याआधी गोविंदराव निकम हयात असतानाही चिपळूण हेच काँग्रेसच्या राजकारणाचे मुख्य केंद्र होते. आता त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू चिपळूण हाच आहे. पण विधानसभा मतदार संघ म्हणून विचार केला तर चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये तळागाळात सर्वाधिक ताकद शिवसेनेची आहे.
या मतदार संघाने आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वादच जास्त पाहिले आहेत. बंडखोरीचे सर्वाधिक प्रकार याच तालुक्यात झाले आहेत. पक्षांतर्गत वादातून आपल्या पक्षाचा उमेदवार पाडण्याचे प्रकारही याच तालुक्यात अधिक झाले आहेत. भास्कर जाधव यांच्या जाण्यानंतरही शिवसेना सावरली असून, शिवसेनेची मतदार संघावरील पकड पुन्हा कायम झाली आहे.