‘त्या’ शिक्षकाला बदला
By Admin | Updated: February 23, 2016 00:22 IST2016-02-23T00:22:00+5:302016-02-23T00:22:00+5:30
शिक्षण समिती सभापतींचे प्रशासनाला आदेश

‘त्या’ शिक्षकाला बदला
देवरुख : नजीकच्या ओझरे मुंढेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील दुसरी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या ओंकार मुंढेकर या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्यामुळे वाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या मारहाण प्रकरणाबाबत सोमवारी शाळेत प्रशासन, शासन व ग्रामस्थांसमवेत दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण सभापती विलास चाळके यांनी पंचायत समिती देवरुखच्या शिक्षण विभागाला संबंधित शिक्षकाची बदली करुन दोन दिवसात बदली शिक्षक देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळा, ओझरे मुंढेकरवाडी येथील शिक्षक शेखर देशपांडे याने दुसरीतील ओंकार संजय मुंढेकर याला मारहाण केली होती. हा प्रकार गुरुवारी घडला होता. मारहाणीमुळे या विद्यार्थ्याला वेदना होऊ लागल्याने ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याचवेळी त्या विद्यार्थ्याला दवाखान्यात नेण्यात येऊन उपचार करण्यात आले. याबाबतची तक्रार विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी देवरुख पोलीस ठाण्यातदेखील शुक्रवारी दिली.
दरम्यान शाळेतील दुसरीतील विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी मारहाण करणारा शिक्षक देशपांडे याचे निलंबन करावे, अशी मागणी शिक्षण विभागाकडे लावून धरली होती. निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी शनिवार शाळा बंद आंदोलनची भूमिका घेतली होती. तसेच शिक्षण विभागावर थडकण्याचा देखील निर्णय घेतला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळके, जिल्हा परिषदेच्या वेदा फडके, ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण टक्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र गीते, सदस्या संतोष मुंढेकर, लक्ष्मण मुंढेकर, शांताराम मुंढेकर आदी ग्रामस्थांसह गटशिक्षणाधिकारी एस. डी. देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी सातपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका कांगणे उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन या शिक्षकाची बदली करुन त्या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाची दोन दिवसात नियुक्ती करण्याचे तोंडी आदेश शिक्षण सभापती विलास चाळके यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्रामस्थांनी या शिक्षकाचे निलंबन व्हावे, अशी मागणी रेटून धरली आहे. दोन दिवसात शिक्षक न मिळाल्यास आपले आंदोलन पुन्हा सुरुच राहील, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
वस्तुनिष्ठ अहवाल देणार!
दरम्यान गटशिक्षणाधिकरी एस.डी. देसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, झाल्या प्रकाराचा वस्तुनिष्ठ अहवाल आपण वरिष्ठांकडे पाठवून देणार आहोत. त्यांचे निलंबन करण्याचे अधिकार हे आपल्या पातळीवरचे नाहीत.