बालकांना शिक्षणात आणण्याची धडपड

By Admin | Updated: November 6, 2014 22:07 IST2014-11-06T21:20:22+5:302014-11-06T22:07:05+5:30

वात्सल्य मंदिर : शिक्षण आणि आरोग्यासाठी दुर्गम भागात अविरत चळवळ --आधारवड

The challenge to bring children to education | बालकांना शिक्षणात आणण्याची धडपड

बालकांना शिक्षणात आणण्याची धडपड

२६ जानेवारी १९७७ रोजी देवरूखच्या मातृमंदिर संस्थेच्या दवाखान्याची एक शाखा ओणी (ता. राजापूर) येथे सुरू झाली. यासाठी ओणी आणि कोदवली ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे होते. तेव्हाचे खासदार स्वर्गीय प्रा. मधु दंडवते हे या संस्थेचे पदाधिकारी होते. एके दिवशी ते ओणीत आले असता या ग्रामस्थांनी या भागात आरोग्य सुविधा सुरू व्हायला हवी, असे सांगितले. दंडवते यांनी संस्थेसमोर हा प्रस्ताव ठेवत ओणीत दवाखाना सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आणि १९७७ साली ओणी येथे दोन खोल्यांमध्ये दवाखाना सुरू केला. या दवाखान्याचे उद्घाटन प्रमिला दंडवते, नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झाले. या रूग्णालयाला पी. बी. मंडलिक ट्रस्टने आर्थिक हात दिल्याने या रूग्णालयाचे नाव पी. बी. मंडलिक रूग्णालय असे झाले. याचवेळी डॉ. महेंद्र मोहन गुजर हे मुंबईत काम करीत होते. खेड्याकडे जाऊन काहीतरी कार्य करावे, ही त्यांच्या मनात प्रबळ इच्छा होती. त्याचवेळी या रूग्णालयात काम करण्यासाठी त्यांना विचारणा करण्यात आली. ही संधी वाया न दवडता डॉ. महेंद्र गुजर यांनी या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवाभावी वृत्तीने धुरा सांभाळण्यास सुरूवात केली. या रूग्णालयाचा लाभ आजूबाजूच्या अनेक गावातील लोकांना होऊ लागला. संस्थेचे कार्य सुरू झाले, पण त्यानंतर अनेक समस्यांचा सामना या संस्थेला करावा लागला. पिण्याचे पाणी, अंधश्रध्दा अस्पृश्यता, निरक्षरता आदी आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्या संस्थेपुढे उभ्या राहिल्या. मात्र, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने या समस्यांवरही उपाय मिळू लागले. पुढे मातृमंदिर संस्थेच्या बालगृहातील मुले ओणीत आणून ठेवली गेली. मात्र, पुढे आलेल्या अनेक तांत्रिक अडचणींमुळे ओणी आणि देवरूख संस्था वेगवेगळ्या असणे गरजेचे वाटू लागले आणि स्वायत्त अशा ‘वात्सल्य मंदिर संस्थे’ची स्थापना १९९८ मध्ये झाली. आणि मग या संस्थेचे कार्य स्वतंत्रपणे सुरू झाले.
शिक्षण आणि आरोग्य या दोन मुद्द्यांवर काम करण्यासाठी डॉ. महेंद्र गुजर यांनी या संस्थेच्या माध्यमातून माता - बाल संगोपन यांसारखे उपक्रम राबविले. हे कार्य करताना एक बाब लक्षात आली की, दवाखान्यात येणारा बहुतांश वर्ग हा खाणकामगार होता. त्यामुळे या वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. गुजर यांनी या कामगारवर्गाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने कामगार संघटना तयार केली. या कामगारांच्या आर्थिक दुर्बलतेचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. त्यामुळे संस्थेने पोल्ट्री फॉर्म आणि सहकारी दूध सोसायटी तयार केली. हे कार्य करताना सरकारी योजना तळागाळात पोहोचविण्याचे कामही ही संस्था करीत आहे. या संस्थेचे १०० मुलांचे बालकाश्रम आहे. २००५ सालापासून जलस्वराज्य प्रकल्पही या संस्थेने राबविला आहे. कौटुंबीक हिंसाचारासारख्या ज्वलंत सामाजिक समस्याच्या निराकरणासाठी तयार झालेल्या कायद्याबाबत प्रबोधन आणि त्याची अंमलबजावणीसाठीही ही संस्था काम करतेय. डॉ. गुजर यांनी १९८० ते ८६ या कालावधीत कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी प्रभावीपणे कार्य केले. त्यामुळे आतापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात अग्र क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाहासाठीही डॉ. गुजर यांचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्र सेवा दल तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे खरे कार्यकर्ते असलेल्या डॉ. गुजर यांनी या भागात लोकचळवळीचे अतिशय चांगले काम केले आहे. संस्थेच्या माध्यमातून ओणी, वडवली आणि आता वडदहसोळ अशा तीन शाळा सुरू झाल्या आहेत. हसोळ येथे टेक्निकल स्कूल सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. गावात संस्थेने व्यायामशाळाही सुरू केली आहे. राजापूर तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या मुलांना अजूनही पुढे काय करायचे, यासाठी योग्य मार्गदशन मिळत नाही. यासाठी राजापूर तालुक्यात उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात मार्गदर्शन केंद्र सुरू करायचे आहे. तालुक्यातील एकही मुलगा वा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. त्याकरिता डॉ. गुजर यांनी आपल्या आई-वडिलांच्या नावे ‘कमल - मोहन ट्रस्ट’ची निर्मिती केली आहे. संबंधित ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मुलांना शिक्षणाचा आधार मिळतोय. या संस्थेतून आजपर्यंत १४५ विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. संस्थेच्या या कार्याची दखल घेत चंदूभाई मेहता सामाजिक कार्य पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, हेल्प फाऊंडेशन फॉर सोशल ग्रोथ, समाज गौरव आदी पुरस्काराने संस्थेला गौरविले आहे. अनेक आव्हाने झेलत ही संस्था कार्य करीत आहे.
- शोभना कांबळे

तरूण पिढीही सामाजिक कार्यात पुढे येतेय
वात्सल्य मंदिरच्या कार्याने प्रभावित होऊन तरूण पिढी या संस्थेला हातभार लावण्यासाठी पुढे येतेय. या मुलांना योग्य दिशा दिली आणि त्यांच्यासमोर उद्दिष्टे ठेवली तर हीच मुले अतिशय चांगल्या तऱ्हेने समाजात कार्य करू शकतील, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. महेंद्र गुजर व्यक्त करतात, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या युवकांचे योगदान बहुमोल ठरणार आहे. यात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. संस्थेसाठी कार्य करण्याच्या त्यांच्या या तळमळीतूनच संस्थेच्या कार्याला भविष्यात नक्कीच गती मिळणार आहे आणि संस्थेच्या कार्याची ही खरी पोचपावती असल्याचे डॉ. गुजर सांगतात.

Web Title: The challenge to bring children to education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.