गुहागर : येथील खरे-ढेरे महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना थेट पदवी प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेचे विधिमंडळातील प्रतोद भास्कर जाधव यांनी बुधवारी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून अधिवेशनात आवाज उठविला. त्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयात सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची टिप्पणी करत कारवाईचे आदेश दिले.गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा प्रवेश, त्यांची हजेरी, त्यांच्या परीक्षा सारे काही बोगस दाखवून त्यांना मुंबई विद्यापीठाकडून थेट तिसऱ्या वर्षाचे पदवी प्रमाणपत्र दिले जात असल्याचे आणि त्यातून मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचे डिसेंबर, २०२४ च्या दरम्यान निदर्शनास आले.महाविद्यालयात चालणारी अशाप्रकारची बेकायदेशीर व नियमबाह्य कामे करण्यास नकार दिला म्हणून दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी संस्थाचालकांनी ३ प्राध्यापकांना मारहाण केली गेली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून या महाविद्यालयातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना अशाप्रकारे थेट पदवी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थाचालकांना वाचविण्याचे धक्कादायक प्रयत्न सुरू आहे. या घोटाळ्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा उलगडा करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.त्यांनी उपस्थिती केलेल्या या मुद्द्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत हे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद केले. या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
गुहागर येथील खरे-ढेरे महाविद्यालयात प्रमाणपत्राचा गैरव्यवहार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:12 IST