शृंगारतळी बाजारपेठेवर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: August 31, 2015 21:29 IST2015-08-31T21:29:01+5:302015-08-31T21:29:01+5:30
शांतता समिती बैठक : ईद-गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन

शृंगारतळी बाजारपेठेवर सीसीटीव्हीची नजर
शृंगारतळी : शृृंगारतळी येथील बाजारपेठेत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शांतता कमिटी बैठकीत ही माहिती देण्यात आली.यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधीक्षक महादेव गावडे यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत पार पडतील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याबरोबर दोन्ही उत्सवाच्या काळात पोलिसांची करडी नजर असणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी, डीजेवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे कुठलेही अनुचित प्रकार होणार नाहीत, याची दक्षता नागरिकांनी बाळगावी.यावेळी पोलीस निरीक्षक विनित चौधरी, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच सविता भेकरे, उपसरपंच संजय पवार, सुशील वेल्हाळ, साबीर साल्हे, महेश कोळवणकर, दिनेश चव्हाण, अनंत चव्हाण, गुलाम तांडेल, सत्यप्रकाश चव्हाण उपस्थित होते. या बैठकीवेळी बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने फुकट जनावरे देण्याची योजना आखली आहे. यासाठी काही गावातील लोक मोकाट जनावरे उचलण्याची तयारी करत आहेत. तसेच गुहागर तालुक्याच्या बाहेर जाणाऱ्या जनावरांना पोलीस अडवणार नाहीत. मात्र, त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे पत्र असणे आवश्यक आहे. मोकाट जनावरे उचलताना मालकांकडून विरोध झाला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जनावर मालकांकडे आपली जनावरे बाजारपेठेतून घेऊन जाण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत. बाजारपेठेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.़ गणेशोत्सव काळात वडापचालकांनी शिस्त बाळगावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी खासगी बस वाहतूक प्रकरणावरून तापलेले वातावरण पाहता आगामी काळात पोलीस प्रशासनाला खासगी बसधारकांचा प्रश्न हाताळावा लागणार आहे. या अनुषंगाने सोमवारी पुन्हा खासगी बसमालक चालक व ग्रामस्थाची बैठक लावण्यात येणार आहे. (वार्ताहर)
गुहागर तालुक्याबाहेरील खासगी आराम बस मालक व चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. रात्रीच्यावेळी या गाड्यांमुळे वाहतुक कोंडी होत आहे. यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा वेळप्रसंगी उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे़
-अनंत चव्हाण, पाटपन्हाळे
सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. गणेशोत्सव काळात खासगी गाड्यांमुळे नागरिकांची सोय होत असेल तर त्यात वावगे काही नाही. फक्त शिस्तीने व्यवसाय करावा.
-सुशील वेल्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, शृंगारतळी