वाऱ्यामुळे आंबा पडून शेतकऱ्यांचे नुकसान
By Admin | Updated: April 7, 2015 01:30 IST2015-04-06T22:54:05+5:302015-04-07T01:30:19+5:30
संकटामागून संकटे : आता सामना धुळीच्या वादळाशी

वाऱ्यामुळे आंबा पडून शेतकऱ्यांचे नुकसान
रत्नागिरी : कोकणचे मुख्य पीक असलेल्या हापूस आंब्यामागील संकटांचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. मार्चमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. उरलेली कसर धुळीचे वादळ व प्रचंड वेगाने वाहणारे वादळी वारे भरून काढत असल्याचे दिसून येत आहे. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळणे शिवाय तयार फळे पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा व काजूपिकाचे एकूण ३१,८१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पैकी २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक, तर ११०९६ हेक्टर क्षेत्रावरील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
गेले तीन चार दिवस प्रचंड वेगाने वारे वाहात आहेत. वाऱ्यामुळे फळधारणा झालेली झाडे कोसळणे किंवा फांद्या मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणावर आंबा वाऱ्याने पडून वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. धूळ प्रचंड प्रमाणात उडत असल्यामुळे आंब्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंब्याचा नैसर्गिक रंग बदलून धुरकट होण्याची शक्यता आहे.
आंबापीक उत्पादनासाठी वर्षभर शेतकऱ्यांना घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत तसेच करावा लागणारा खर्च लक्षात घेता यावर्षी उत्पादित पिकाचे नुकसानच मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास येत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आदेश असतानासुध्दा कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे महिनाभराने अहवालप्राप्त झाला. परंतु धुळीचे वादळ यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने पाठविणे गरजेचे आहे. अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी विक्रीस पाठविण्याची सुरूवात केली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
धुळीमुळे आंब्याचा मूळ रंग बदलण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. आंबा पुसावा लागणार आहे. मात्र, पुसल्यामुळे नैसर्गिक रंगात बदल होईल, पुन्हा दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आंबा व्यवसाय शेतकऱ्यांना तारण्याऐवजी नुकसानाचा धक्का सोसावा लागणार आहे.