पंख छाटलेल्या ‘कोकणसुंदरी‘चे कॅटवॉक
By Admin | Updated: March 14, 2016 00:23 IST2016-03-13T22:32:23+5:302016-03-14T00:23:32+5:30
कोकण सुंदरी यंदा कॅटवाक करणार काय याकडे लक्ष आहे.

पंख छाटलेल्या ‘कोकणसुंदरी‘चे कॅटवॉक
रत्नागिरी : आठ वर्षांपासून रत्नागिरीत होणारी कोकण सुंदरी स्पर्धा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेवर आर्थिक भार असलेल्या या स्पर्धेसाठी यावेळी संस्कृती ग्रुपतर्फे मागणी करण्यात आलेले ७ लाख ९० हजारांचे अनुदान १० मार्चच्या सभेत नामंजूर करण्यात आले. त्यामुळे ‘कोकण सुंदरी स्पर्धे’चे आर्थिक पंखच कापले गेले आहेत. त्यामुळे कोकण सुंदरी यंदा कॅटवाक करणार काय याकडे लक्ष आहे.
कोकण सुंदरी स्पर्धेला यावेळी ७.९० लाखांचे अनुदान पालिकेने द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव ही स्पर्धा घेणाऱ्या संस्कृती गु्रुपने पालिकेकडे ठेवला होता. हा प्रस्ताव चर्चेला येताच नगराध्यक्षपद भाजपकडे असले तरी सभागृहातील बहुमत असलेल्या सेनेच्या सदस्यांनी अनुदान देण्यास विरोध केला. सेनेचे नगरसेवक मिलिंद कीर, पक्षप्रतोद बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे तसेच सेनेचे अन्य नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक उमेश शेट्ये यांनी या स्पर्धेचे समर्थन करीत अनुदान याआधीही दिले आहे, आता द्यायला काय हरकरत आहे, असे सांगितले. मात्र, सेनेच्या सदस्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत शहरात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आधी त्या कामांसाठी निधी वापरूया, असे सांगत हा प्रस्ताव धुडकावून लावला. भाजपच्या दीपा आगाशे यांनीही चर्चेत सहभागी होताना नगरपरिषद क्षेत्र रत्नागिरी शहरापुरते आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांची उधळण शहराबाहेर व्याप्ती असणाऱ्या कार्यक्रमासाठी कशासाठी? असा सवाल केला. अनुदान दिलेले नसले तरी ही स्पर्धा होणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)