काजूवरील किडीचे नियंत्रण हवे
By Admin | Updated: May 25, 2015 00:38 IST2015-05-24T22:06:20+5:302015-05-25T00:38:55+5:30
दुर्लक्षाने झाडाचा जातो जीव : परकीय चलन मिळवून देणारे उत्पादन

काजूवरील किडीचे नियंत्रण हवे
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -काजू हे परकीय चलन मिळवून देणारे एक महत्त्वाचे पीक आहे. काजू पिकामध्ये किडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काजू पिकामध्ये किडीमुळे फारसे नुकसान होत नाही, असा समज आहे. परंतु आतापर्यंत काजूवर ६० किडींची नोंद झाली असून, त्यापैकी काजूवरील ढेकण्या कीड, खोड व मूळ पोखरणारी अळी (रोठा), बी व बोंडू पोखरणारी अळी व फुलकीड या अतिशय महत्त्वाच्या किडी आहेत. काजूचे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने या महत्त्वाच्या किडीचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. काजूवरील खोड व मूळ पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव जमिनीलगतच्या खोडाजवळ तसेच मुळावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास झाड मरून जाते. या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो.
काजूवरील खोड व मूळ
पोखरणारी कीड (रोठा)
काजूवरील खोड किडीच्या तीन जाती आढळून येतात. त्यापैकी दोन जाती काजूसाठी हानिकारक असून, तिसरी जात कमी हानिकारक आहे. रोठा या किडीचा प्रादुर्भाव अळी अवस्थेमध्ये असताना दिसतो. या किडीची अळी सुरुवातीला झाडाच्या खोडावरील किंवा मुळावरील साल यावर आपली उपजीविका करते. कालांतराने आतील खोडाचा भाग पोखरून त्यावर आपली उपजीविका करते.
जीवनक्रम : या किडीची मादी काजूच्या खोडाच्या सालावरील भेगामध्ये उघड्या पडलेल्या मुळामध्ये सालीवर जाड तांदळाच्या दाण्यासारखी १०० ते १२५ अंडी घालते. या अंड्यातून ८ ते १० दिवसात लहान अळ्या बाहेर पडतात आणि सालीला भोक पाडून आत शिरतात व आपली उपजीविका सुरू करतात. या किडीची अळी अवस्था साधारणत: २०८ ते २५६ दिवसांची असते. या किडीची अळी खोडातच कोषावस्थेत जाते. कोषावस्थेचा कालावधी १ ते २ महिने चालतो. अशाप्रकारे संपूर्ण जीवनक्रम २५० ते ३०० दिवसात पूर्ण होतो.
प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीचा प्रादुर्भाव काजूबागेमध्ये वर्षभर आढळून येतो. परंतु डिसेंबर ते मे या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. पावसाळ्यात या किडीच्या प्रादुर्भावामुळे काजूचे झाड पिवळसर दिसते.
सशक्त झाड हिरवे दिसते. बी जमवण्याच्यावेळी झाडाच्या जमिनीलगतच्या खोडाचे जवळून निरीक्षण केल्यास प्राथमिक अवस्थेत प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो आणि त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रादुर्भित भागाला योग्य ती उपाययोजना करता येते. झाडाच्या खोडाजवळ डिंक मिश्रित भुसा पडलेला दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव दुर्लक्षित बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
अळी जसजशी मोठी होत जाते, तसे भुशाचे प्रमाण वाढत जाते. किडीच्या अळ्या अंड्यातून बाहेर पडून सालीला भोके पाडून आत शिरतात व मोठ्या प्रमाणात झाडाचे नुकसान करतात.
खाल्लेला भाग भुसा व विष्ठेने भरून पुढे सरकवतात. हा भाग खाल्ल्यामुळे झाडाची पाणी व अन्नद्रव्ये वाहून नेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते व त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडतात. निस्तेज होऊन गळतात, फांद्या वाळतात व शेवटी झाड सुकून जाते.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता हवी. महिन्यातून एकदा झाडांचे बुंधे व्यवस्थित बघावेत.
एखाद्या झाडाला रोठा लागलेला आढळून आल्यास लगेच पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तेवढ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात व त्यावर क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे कीटकनाशक काढलेल्या भागाची पूर्ण भिजवणी करून उरलेले द्रावण मुळाशी ओतावे.
काजूच्या झाडातून अळी काढताना झाडाच्या सालीला जास्त नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. कारण जर या झाडाची साल जास्त प्रमाणात काढली तर त्यामुळे झाड मरते, असे सांगितले जाते.
काजूपीक हे तसे फायदा मिळवून देणारे असले तरीही या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला तर पीक कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे काजू पिकाबाबत शेतकऱ्यांनी दक्ष राहाणे फायदेशीर ठरते. विशेषकरून काजूवरील किडीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने बागायतदाराने सजग असणे आवश्यक आहे.
किडीचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
बागेतील किडीचा प्रादुर्भाव कमी करणे.
प्राथमिक अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव कमी करणे.
रोठ्याने पूर्णपणे मेलेली झाडे मुळासकट काढून जाळून टाकावीत.
या किडीचा प्रसार कमी करण्यासाठी खोड व मूळ प्रादुर्भित झाडे बी जमवताना किंवा इतर वेळी प्रादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ओळखून अळी काढून कीटकनाशक घालावे. ५० टक्केपेक्षा जास्त खोडाचा भाग प्रादुर्भित असलेली पूर्ण झाडे काढून त्याची लाकडे बागेत ठेवू नयेत. तसेच ही लाकडे त्वरित जाळण्यासाठी वापरावीत.
कीटकनाशकांची मात्रा
क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही १० मिली प्रतिलीटर पाण्यातून एका झाडाला साधारणत: पाच लीटर पाणी द्यावे. एखाद्या वेळेस या किडीची अळी सालीला छिद्र पाडून आत प्रवेश करते. अशा वेळेस तारेच्या हुकाने अळी काढता येते का ते बघावे. नाही तर अशा छिद्रामध्ये क्लोरोपायरीफॉस १० मिली + रॉकेल ५० मिली असे ओतावे व छिद्र ओल्या मातीने बंद करावे.