दहिदीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By Admin | Updated: August 14, 2014 22:41 IST2014-08-14T22:27:12+5:302014-08-14T22:41:24+5:30
दहिदीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

दहिदीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
ंकौळाणे : मालेगाव तालुक्यातील दहिदी येथे गेल्या महिनाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, त्यात एका वासरा जीव घेतला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनतेत भीतीचे वातावरण आहे.
दहिदी गावालगतच दहिद्या डोंगर आहे. या डोंगरावर गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे भयग्रस्त ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व वनविभागास त्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने बिबट्यास पकडण्यासाठी तेथे पिंजराही ठेवला. हा पिंजरा डोंगराच्या विरुद्ध दिशेने पलीकडील बाजूस ठेवण्यात आला असून, प्रत्यक्षात बिबट्या हा दुसरीकडे भटकत आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे या बिबट्याने स्थानिक शेतकरी दिलीप दयाराम कचवे यांच्या वाड्यातील गाईच्या वासरावर हल्ला चढविला. त्यात सदर वासरू मृत्युमुखी पडले. त्यानंतर बिबट्या फरार झाला आहे. कचवे गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता सदर प्रकार उघडकीस आला. वनविभागास या प्रकाराची माहिती दिल्यानंतर वनकर्मचारी सूर्यवंशी यांनी पंचनामा केला. त्यामुळे दहिदीच्या ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील जनता व या भागातून ये -जा करणाऱ्या वाहनधारकांनी या बिबट्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)