स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:15+5:302021-04-10T04:30:15+5:30
लाेकप्रिय पाेलीस अधीक्षकांच्या यादीत रत्नागिरी जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ.माेहितकुमार गर्ग यांचा समावेश झाल्याने व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई यांनी ...

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करा
लाेकप्रिय पाेलीस अधीक्षकांच्या यादीत रत्नागिरी जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ.माेहितकुमार गर्ग यांचा समावेश झाल्याने व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पाेलीस अधिकारी व व्यापारी उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या रत्नागिरीतील व्यापाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करून, नव्या स्पर्धेसाठी सज्ज होण्याचे मार्गदर्शन केले. त्याचबराेबर, व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. लाॅकडाऊनच्या संदर्भात रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी पाेलीस अधीक्षक डाॅ.गर्ग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या वाढत्या संकटात सर्वात मोठा फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. भविष्यातही ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत स्पर्धा करत व्यापार टिकवायचा असेल, तर व्यापाऱ्यांनी आपली उत्पादने विकण्यासाठी एखादा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करावा. हे करण्यासाठी जी काही मदत लागेल, ती मी माझ्याकडून करेन, असे डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी व्यापारी महासंघाला सांगितले. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून भविष्याच्या दृष्टीने मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केल्यास मोठमोठ्या कंपन्यांसोबत तुम्हाला स्पर्धा करता येणे शक्य होणार असून, स्पर्धेत टिकून राहता येईल, असे त्यांनी सांगितले. तुमचा बंदला जरूर विरोध करा, परंतु कोणतेही आंदोलन करताना कायदा हातात घेऊ नका, असे त्यांनी सांगितले.
समाजहिताच्या प्रश्नावर जरूर भाष्य करा. मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले. यावेळी भारतातील ५० लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या यादीत डॉ.मोहितकुमार गर्ग यांचा समावेश झाल्याने रत्नागिरी व्यापारी महासंघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, निखिल देसाई, गणेश भिंगार्डे, हेमंत वणजु, किशोर मोरे, सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.