रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी काळबादेवीत उभारणार पूल
By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2023 13:26 IST2023-06-17T13:25:58+5:302023-06-17T13:26:34+5:30
काेकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती

रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी काळबादेवीत उभारणार पूल
रत्नागिरी : काेकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावरील काळबादेवी (ता. रत्नागिरी) येथे पूल उभारण्यात येणार असून, त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. भू-तांत्रिक तपासणीसाठी बोअरवेल पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याला एमएसआरडीसीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या सागरी मार्गावरील सुमारे १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल. या परिसरातील शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरीतील काळबादेवी खाडीचा समावेश आहे. काळबादेवी ते मिऱ्या या सुमारे ६०० मीटरहून अधिक अंतर असलेल्या खाडीवरील पूल उभारण्यासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
एमएसआरडीसीच्या पत्रानुसार, स्टाफ कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामध्ये भू-तांत्रिक आणि मृदा अन्वेषण केले जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुलाचे पिलर उभारण्यासाठी भू-संरचना कशी आहे हे निश्चित होईल.
दरम्यान, रत्नागिरी ते गणपतीपुळे या मार्गावर शिरगाव आणि परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे काळबादेवी खाडीवर पूल उभारून किनारी भागातून रस्ता बनवण्याबाबत काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु, याला काही कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे तो मागे पडला होता.