चौपदरीकरणाला बाजारपेठांमध्ये ब्रेक
By Admin | Updated: July 13, 2015 00:36 IST2015-07-12T23:08:31+5:302015-07-13T00:36:06+5:30
मुंबई-गोवा महामार्ग : अतिरिक्त जमिन मोजणी पूर्ण

चौपदरीकरणाला बाजारपेठांमध्ये ब्रेक
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात सहा हजारांपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा महामार्ग म्हणजे ‘डेड ट्रॅक’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या मार्गावरील मरणकळा संपाव्यात, यासाठी लोकांच्या मागणीनुसार इंदापूर ते झाराप या ३८४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण ५ हजार कोटी खर्च करून केले जाणार आहे. मात्र, पाली, लांजा बाजारपेठ व राजापूर शहरातील काही भागामुळे चौपदरीकरणाच्या कामाला सध्यातरी ब्रेक लागला आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ० ते ८४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम याआधीच सुरू आहे. तर झाराप ते पात्रादेवी या २१.५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता इंदापूर ते झारापपर्यंतच्या ३८४ किलोमीटर्स महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर या प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
चौपदरीकरणासाठी मुंबई - गोवा महामार्गाचा २१३ किलोमीटरचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात असून, १०७.९ किलोमीटर रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. दोन्ही जिल्ह्यातील महामार्गावर १९ मोठे पूल व ७१ लहान पूल आहेत. या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रही आपोआपच कमी होणार आहेत. मात्र, पाली बाजारपेठ व लांजा बाजारपेठेत चौपदरीकरण करताना दोन्ही बाजूने दुकाने मागे घ्यावी लागणार आहेत. तसेच राजापुरातही काही धार्मिक जागा अडचणीच्या ठरल्या आहेत. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला ब्रेक लागला असून, या समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
महामार्गावरील मरणकळा थांबणार?
चौपदरीकरणासाठी मुंबई -गोवा महामार्गाचा २१३ किलोमीटरचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात असून, १०७.९ किलोमीटर रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या दोन्ही जिल्ह्यात महामार्गावर १९ मोठे पूल व ७१ लहान पूल आहेत. चौपदरीकरणामुळे महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रही आपोआप कमी होणार आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.