खाडीपट्ट्यात दुर्मीळ वनौषधींची तोड
By Admin | Updated: September 17, 2014 22:25 IST2014-09-17T21:22:31+5:302014-09-17T22:25:16+5:30
वन, महसूल अंधारात : कवडीमोल भावाने केली जातेय कत्तल

खाडीपट्ट्यात दुर्मीळ वनौषधींची तोड
खाडीपट्टा : खेड तालुक्यातील वन व महसूल विभागाला अंधारात ठेवून लाकूड व्यापारी इतर वृक्षांबरोबरच वनौषधींची तोड करत आहेत. खाडीपट्टासारख्या जंगली भागात यापूर्वी अनेक दुर्मीळ वनौषधी आढळून येत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यामध्ये झपाट्याने घट झाली आहे. तालुक्यात वनौषधींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांना कवडीमोल मोबदला देऊन ही वनौषधी खरेदी केली जात आहे.
नालगुंद, काविळ, धुपनी, धावरा, मोड, दमा, हातपाय सुजणे, पोटदुखी, फोड येणे, हगवण, ताप, खोकला, सर्दी, वात अशा विविध आजारांवरील उपचारासाठी वनौषधींचा वापर केला जातो. याची माहिती घेऊन तालुक्यातील या वनौषधींची दिवसभर जंगलात तोड केली जाते व रातोरात वनौषधींची पोती भरुन ट्रकमधून याची तस्करी केली जाते. खेड तालुक्यातील खाडीपट्टा, कांदोशी खोरे, सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांच्या पायथा आदी भागातील घनदाट जंगलामध्ये वनौषधी मुबलक प्रमाणात आढळून येते. येथील लाकूडतोड करणारे एजंट वनौषधीची कवडीमोल दराने खरेदी करुन दुहेरी फायदा घेत आहेत.
खेड तालुक्यातील अतिमहत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या खाडीपट्टा भागातील खेड-पन्हाळजे मार्गालगत असणारा डोंगराळ भाग जंगलतोडीमुळे उजाड पडला आहे. काही वर्षांपूर्वी खेड - पन्हाळजे मार्गावर कर्जी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अवैध लाकूडसाठा जप्त केला होता. जंगलतोड दाखवा कारवाई करतो, असे म्हणत आपली जबाबदारी झटकणाऱ्या वन विभागाला अखेर त्यावेळी येथील साठ्यावर कायदेशीर कारवाई करावी लागली होती. तसेच तालुक्यातील अवैध वृक्षतोडीवर कायद्याच्या पळवाटा काढत थोडे झुकते माप देणाऱ्या वन खात्याला यामुळे चांगलीच चपराक बसली होती.
लाकूड व्यापार करणे अयोग्य नाही. त्याप्रमाणे बहुतांश व्यापारी वन विभागाकडे परवानगी घेऊन हा व्यवसाय करतात. परंतु, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई होत नसल्यामुळे परवाना घेऊन व्यापार करणाऱ्यांची नावे बदनाम होतात.
याबाबत खेडचे वनपाल एस. जी. सुतार यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही खेड खाडीपट्ट्यातील कोरेगाव व नांदगाव येथे काही लाकूडतोडीला पूर्वी परवानगी दिली होती. मात्र, पावसाळ्यात लाकूडतोडीवर बंदी असल्याने कोणालाही लाकूड तोडीची परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
तसेच चौकशी करुन अवैध लाकूडतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी वनपाल सुतार यांनी सांगितले. (वार्ताहर)
वृक्षतोड नियमानुसार करण्यास जाणाऱ्या लोकांसाठी खूपच किचकट नियम आहेत. त्या नियमांचे पालन करेपर्यंत ते झाड उन्मळून पडेल, एवढी नियमाची जंत्री आहे. परंतु विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने कायदेशीर मार्गाने जाणाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. वन विभाग कधी तरी जागे होईल का? असा सवाल होत आहे.
वन विभागाचे अभय ?
नालगुंद, काविळ, धुपनी, धावरा, मोड, दमा, हातपाय सुजणे, पोटदुखी, फोड येणे, हगवण, ताप, खोकला, सर्दी, वात यावर उपचारासाठी वनौषधींचा वापर.
खाडीपट्टा, कांदोशी खोरे, सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांच्या पायथा आदी भागातील घनदाट जंगलामध्ये वनौषधी मुबलक.
लाकूडतोड करणारे एजंट वनौषधीची कवडीमोल दराने खरेदी करतात.